नवा सेहवाग! भारताच्या या क्रिकेटपटूचा नवा विक्रम
भारत आणि श्रीलंकेमध्ये सुरु असलेली अंडर १९ यूथ टेस्ट सीरिज जोरदार चर्चेत आहे.
हंबनटोटा : भारत आणि श्रीलंकेमध्ये सुरु असलेली अंडर १९ यूथ टेस्ट सीरिज जोरदार चर्चेत आहे. पहिल्या टेस्टमध्ये भारताचा इनिंग आणि २१ रननी विजय झाला. तर दुसऱ्या मॅचमध्ये पवन शाहनं विक्रमी द्विशतक झळकावलं. शाहनं २८२ रन केले. अंडर-१९ क्रिकेटमधील भारतीय क्रिकेटपटूचा हा सर्वाधिक स्कोअर आहे. शाहनं तन्मय श्रीवास्तवचं २२० रनचं रेकॉर्ड मोडलं. श्रीवास्तवनं २००६ साली पाकिस्तानविरुद्ध पेशावरमध्ये ही खेळी केली होती. अंडर १९ क्रिकेटमधला पवन शाहचा हा दुसरा सर्वात मोठा स्कोअर आहे. ऑस्ट्रेलियाच्या क्लिंटन पीकनं १९९५ साली ३०४ रनची खेळी केली होती.
शाहच्या ६ बॉलमध्ये ६ फोर
शाहनं इनिंगच्या १०८ व्या ओव्हरमध्ये लागोपाठ ६ फोर मारले. यातली पहिली फोर मारून शाहनं द्विशतक पूर्ण केलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये याआधी संदीप पाटील यांनी ६ बॉलला ६ फोर मारले होते. इंग्लंडचे फास्ट बॉलर बॉब विलीस यांच्या बॉलिंगवर पाटील यांनी हे रेकॉर्ड केलं होतं. पण या ओव्हरमध्ये विलीस यांनी एक नो बॉलही टाकला होता.
भारतीय टीमनं दिवसाची सुरुवात ४ विकेटवर ४२८ रन अशी केली होती. यानंतर ६१३/८ या स्कोअरवर भारतानं इनिंग घोषित केली. बॅटिंगला आलेल्या श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा श्रीलंकेनं ४ विकेट गमावून १४० रन केले होते. फास्ट बॉलर मोहित जांगडानं श्रीलंकेच्या ३ विकेट घेतल्या.