Asia Cup 2023: ठरलं तर! ना भारत ना पाकिस्तान, `या` देशात होणार IND vs PAK सामना
India vs Pakistan Asia Cup 2023: आशिया कपचा (Asia Cup 2023) सामन्यासाठी हायब्रिड मॉडेलला आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मान्यता दिल्याने आता भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामना श्रीलंकेत होणार आहे.
India tour of Pakistan: आशिया चषक 2023 चं यजमानपद यंदा पाकिस्तानकडे असल्याने मोठा वाद उभा राहिला होता. आशिया कपला येत्या 31 ऑगस्टपासून सुरूवात होणार असून फायनल सामना 17 सप्टेंबरला खेळवला जाणार आहे. आशिया कपचा (Asia Cup 2023) सामन्यासाठी हायब्रिड मॉडेलला आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मान्यता दिल्याने आता भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामना श्रीलंकेत होणार आहे. दोन्ही देशातील सामना आता श्रीलंकेच्या डांबुला येथे खेळवले जाऊ शकतात. अशातच आता बीसीसीआय सचिव जय शाह (Jay Shah) यांनी मोठी अपडेट दिली आहे.
पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया कपमध्ये दोन सामने खेळवले जाणार आहेत. हे दोन्ही सामने डांबुला येथे होण्याची शक्यता आहे. जर दोन्ही संघ फायनलमध्ये आले तर तिसरी लढाई देखील पहायला मिळू शकते. बीसीसीआयचे सचिव जय शाह आणि पीसीबी प्रमुख झका अश्रफ यांनी टाईम टेबलवर चर्चा करण्यासाठी डरबन येथे भेट घेतली. त्यानंतर आता सामने श्रीलंकेत होणार असल्याचं स्पष्ट होताना दिसत आहे.
भारत, पाकिस्तान आणि नेपाळ असा एक गट. तर श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश असा दुसरा गट असणार आहे. येत्या काही दिवसात याचं अधिकृत वेळापत्रक समोर येण्याची शक्यता आहे. भारत आणि पाकिस्तान वर्ल्ड कपपूर्वी भिडणार असल्याने आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. भारताने चांगली कामगिरी करावी, अशी सर्वांना आशा आहे. त्यासाठी रोहितसेना देखील तयारी करताना दिसते.
पाकिस्तानचा दौरा नाही
बीसीसीआयचे प्रतिनिधी अरुण धुमाळ यांनी शाह यांच्या पाकिस्तान दौऱ्याच्या चर्चेवर स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. 'जय शाह यांनी कोणतेही निमंत्रण स्वीकारलं नाही आणि ते पाकिस्तानला भेट देणार नाहीत', असंही धुमाळ यांनी सांगितलं. ही निव्वळ चुकीची बातमी आहे. बहुधा ते जाणूनबुजून पसरवलं गेलं असावं. मी कोणताही दौरा करणार नाही, असं जय शाह यांनी सांगितलं आहे. आशिया कप 2023 मध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळचे संघ मैदानात उतरणार आहेत.