पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची भारताला धमकी, तर आमच्याविरुद्ध क्रिकेट खेळावं लागेल
भारत आणि पाकिस्तानमधल्या खराब संबंधांमुळे या दोन्ही राष्ट्रांमध्ये क्रिकेटचे सामने होत नाहीत.
कराची : भारत आणि पाकिस्तानमधल्या खराब संबंधांमुळे या दोन्ही राष्ट्रांमध्ये क्रिकेटचे सामने होत नाहीत. यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं भारताला धमकी दिली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या विवाद समाधान समितीनं निर्णय दिला तर २०१९-२०२३मध्ये भारताला पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळावं लागेलय हा निर्णय ऑक्टोबरमध्ये येईल, असं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी म्हणाले आहेत. दोन्ही देशांमधल्या तणावपूर्ण संबंधांमुळे भारत-पाकिस्तानमध्ये क्रिकेट सामने होत नाहीत. या दोन्ही टीम फक्त आयसीसीच्या स्पर्धांमध्येच एकमेकांविरुद्ध खेळतात. भारत सरकारनं परवानगी दिली तरच भारत आणि पाकिस्तानमध्ये क्रिकेटचे सामने होऊ शकतात.
पाकिस्ताननं मागितली नुकसान भरपाई
आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या विवाद समाधान समितीनं खेळण्याविरोधात निर्णय दिला तर आम्हाला सात कोटी डॉलरची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी पाकिस्ताननं केली आहे. याचा निर्णयही ऑक्टोबर महिन्यात होईल, असं आयसीसीनं स्पष्ट केलं आहे.
२०१४ साली झालेल्या आयसीसीच्या बैठकीत भारत-पाकिस्तानमध्ये २०१५ ते २०२३ मध्ये सहा सीरिज खेळवण्यात येतील असा समझोता झाला होता, असं सेठी म्हणाले. पण दोन्ही देशांमध्ये कोणताही करार झाला नसल्याचं प्रत्युत्तर बीसीसीआयनं दिलं आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये क्रिकेट व्हावं ही आमची इच्छा आहे पण हा निर्णय आता भारताला घ्यायचा आहे अशी प्रतिक्रिया सेठी यांनी दिली.