Perth Test: कांगारूंनी साधली बरोबरी, ऑस्ट्रेलियाचा भारतीय संघावर १४६ धावांनी विजय
पर्थ येथे भारतीय क्रिकेट संघाच्या प्रदर्शनाला वेसण घालत ऑस्ट्रेलियाच्या कसोटी क्रिकेट संघाने पाचव्या दिवसाची दणक्यात सुरुवात केली.
मुंबई : पर्थ येथे भारतीय क्रिकेट संघाच्या प्रदर्शनाला वेसण घालत ऑस्ट्रेलियाच्या कसोटी क्रिकेट संघाने पाचव्या दिवसाची दणक्यात सुरुवात केली. भारतीय फलंदाजांना तंबूत परत पाठवत कांगारुंनी चार कसोटी सामन्यांच्या शृंखलेत आता १-१ अशी बरोबरी साधली आहे. पाचव्या दिवसाच्या सुरुवातीला भारतीय संघाला विजयासाठी १७५ धावांची आवश्यकता होती. तर विजयासाठी ऑस्ट्रेलियाला गरज होती पाच गडी बाद करण्याची.
भारतीय संघाचे पाच खेळाडू आधीच तंबूत परतले होते. ज्यानंतर मिशेल स्टार्क आणि नाथन लॉयन या दोघांनी हनुमा विहारी, ऋषभ पंत आणि उमेश यादव यांना लगेचच बाद केलं. त्यामागोमागच पॅट क्यूमिंस याने एकाच षटकात इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांना निशाणा करत त्यांना बाद केलं. या खेळाडूंच्या बाद होण्यासोबतच भारतीय संघाला १४० या धावासंख्येवरच गाशा गुंडाळावा लागला आणि कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाने १-१ अशी बरोबरी साधली. २८७ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ १४० धावांवरच सर्वबाद झाला.
ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज लॉयन आणि स्टार्क यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले. तर, हेझलवूड आणि क्यूमिंसने प्रत्येकी दोन गडी बाद करत संघाला हा विजय मिळवून दिला.
बॉल टॅम्परिंग अर्थाच चेंडू कुरतडण्याच्या प्रकारानंतर हा ऑस्ट्रेलियन संघाचा पहिलाच विजय असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे आता कांगारुंचा हा विजयी रथ असाच पुढे जाणार की, त्याचा वेग कमी करण्यात भारतीय संघाच्या वाट्याला यश येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.