Piyush Chawla Gets Emotional: मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) संघाला यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL 2023) सुरुवातीला काही धक्के बसल्यानंतर आता पुन्हा त्यांची घौडदौड विजयपथावर येताना दिसत आहे. मुंबई इंडियन्सने शुक्रवारी वानखेडेच्या मैदानावर झालेल्या गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात मुंबईने 27 धावांनी विजय मिळवला. या विजयासहीत मुंबईच्या प्ले ऑफमध्ये जाण्याची शक्यता वाढली आहे. मुंबईच्या या विजयामध्ये सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) बरोबरच महत्त्वाचं योगदान दिलं ते पियुष चावलाने. (Piyush Chawla)


आघाडीचा गोलंदाज


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पियुष चावलाने यंदाच्या पर्वामध्ये मुंबईकडून पुनरागमन केलं आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये त्याने 19 विकेट्स घेतल्या आहेत. मुंबईच्या आतापर्यंतच्या घौडदौडीमध्ये चावलाने आपल्या फिरकीच्या मदतीने मोलाचे योगदान दिले आहे. विशेष म्हणजे अनेक तरुण खेळाडू संघात असतानाही 34 वर्षीय पियुष चावला हा 5 वेळा आयपीएल जिंकणाऱ्या मुंबईच्या संघातील यंदाचा आघाडीचा गोलंदाज ठरला आहे. मात्र अचानक पुनरागमन करुन इतकी भन्नाट कामगिरी करण्यामागील खरं कारण पियुष चावलाने गुजरातबरोबरच्या सामन्यातील विजयानंतर सांगितलं आहे.


गुजरातचा उल्लेख


गुजरातविरुद्धच्या सामन्यानंतर जिओ सिनेमावरील एका मुलाखतीत बोलताना पियुष चावलाने आपल्या पुनरागमानासंदर्भातील घडामोडी उलगडून सांगितल्या आहेत. यावेळेस त्याने पार्थिव पटेल आणि गुजरात क्रिकेट असोसिएशनने आपल्याला फार मदत केल्याचा उल्लेख केला. घरगुती क्रिकेट खेळण्यासाठी गुजरात असोसिएशनची मदत झाल्याचं चावला म्हणाला. त्याचबरोबर पुनरागमन करण्यामागील एक स्पेशल कारणाचाही उल्लेख चावलाने केला.


सगळ्या स्पर्धा खेळलो


"मला अजून काही काळ क्रिकेट खेळण्याची खूप इच्छा होती म्हणूनच मी पुनरागमन केलं. मी यापूर्वी कोणत्याही शिबिरांना जात नव्हतो. मात्र या वर्षी मी सर्व शिबिरांना हजेरी लावली आहे. गुजरात क्रिकेट असोसिएशनने मला यामध्ये फार मदत केली. पार्थिवने पण मला यात मदत केली. त्यानंतर मी सर्व स्पर्धांमध्ये खेळलो. डीव्हा पाटील, मुश्ताक अली, विजय हजारे या स्पर्धा मी खेळलो. मला प्रत्यक्ष सामन्यांमध्ये गोलंदाजी करायची होती कारण मी नेटमध्ये यापूर्वी फार गोलंदाजी केली आहे," असं पियुष चावला म्हणाला. 


या व्यक्तीसाठी पुन्हा खेळतोय


आपल्याला पुन्हा क्रिकेट खेळण्याची इच्छा निर्माण होण्यामागील भावनिक कारण सांगताना पियुष चावलाने आपल्या मुलाचा उल्लेख केला. पियुष चावलाचा मुलगा हा केवळ 6 वर्षांचा आहे. माझ्या मुलाने कधीच मला सर्वोच्च स्तरावर क्रिकेट खेळताना पाहिलेलं नव्हतं, असंही चावला म्हणाला. "केवळ पुनरागमन केलं म्हणून नाही तर अन्य एका कारणासाठीही हे पर्व माझ्यासाठी फार खास आहे. मला माझ्या मुलासाठी क्रिकेट खेळायचं होतं कारण त्याने मला खेळताना पाहिलेलं नाही," असं चावला म्हणाला.



माझा सर्वात मोठा क्रिटीक्स


"त्याने जेव्हा मला पाहिलं होतं तेव्हा तो फारच लहान होता. तेव्हा त्याला काही कळत नव्हतं. मात्र आता तो 6 वर्षांचा असून त्या आधीपेक्षा आता बरंच चांगलं कळतं. मात्र तो फार जवळून क्रिकेट फॉलो करतो आणि त्याला हा खेळ चांगलाच समजतोय. म्हणून मला क्रिकेट खेळायचं असून त्याच्यासाठी स्पेशल कामगिरी करायची आहे. तो सामन्यानंतर त्या सामन्यांबद्दल त्याला काय वाटलं याचं तातडीने विश्लेषण करतो. तो माझ्याबरोबर बसून गप्पा मारतो किंवा फोनवरुन चर्चा करतो. तो माझ्या सर्वोत्तम क्रिटीक्स आहे," असं पियुष चावला आपल्या 6 वर्षांच्या अद्वैकबद्दल बोलताना म्हणाला. 



पियुष चावलाने गुजरातविरुद्धच्या सामन्यात दोन गडी बाद केले. त्याने राहुल तेवतिया आणि विजय शंकर यांना तंबूत पाठवलं.