खेळाडूंना वागणं शिकवण्याची गरज, पांड्या-राहुल वादावर द्रविडचं मत
`कॉफी विथ करण` या कार्यक्रमामध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भारतीय संघाचे खेळाडू हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांचं निलंबन करण्यात आलं.
बंगळुरू : 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमामध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भारतीय संघाचे खेळाडू हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांचं निलंबन करण्यात आलं. चौकशी पूर्ण होईपर्यंत हे दोन्ही क्रिकेटपटू कोणत्याही प्रकारचं क्रिकेट खेळू शकणार नाही. 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमात हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांनी महिलांविषयी आणि वैयक्तिक आयुष्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केली होती. यानंतर दोन्ही खेळाडूंवर सडकून टीका झाली होती. या सगळ्या प्रकरणावर आता भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू राहुल द्रविडनं भाष्य केलं आहे.
केएल राहुल आणि हार्दिक पांड्या प्रकरणाचा पराचा कावळा करू नका, असं राहुल द्रविड म्हणाला. तसंच खेळाडूंना मैदानाबाहेर कसं वागावं हे शिकवण्याची गरज असल्याचं परखड मत द्रविडनं व्यक्त केलं आहे. खेळाडूंनी आधी चूक केली नाही किंवा यापुढे त्यांना जागरूक केलं तरी ते चूक करणार नाहीत, असं होऊ शकणार नाही. त्यामुळे या प्रकरणाचा पराचा कावळा करू नका, असा सल्ला द्रविडनं दिला आहे.
मागच्या २ अंडर-१९ वर्ल्ड कपआधी आम्ही खेळाडूंसाठी व्याखानांचं आयोजन केलं होतं. खेळाडूंशी बोलण्यासाठी आम्ही मानसोपचार तज्ज्ञांनाही बोलावलं होतं. खेळाडूंना जबाबदारीची जाणीव व्हावी म्हणून आम्ही कार्यशाळेचंही आयोजन केलं होतं. एनसीएमध्येही खेळाडूंना अशाच प्रकारचं शिक्षण दिलं जातं, असं द्रविडनं सांगितलं.
आम्ही खेळाडूंना शिक्षण देऊ शकतो, पण त्यांनी केलेल्या प्रत्येक गोष्टीची जबाबदारी घेऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया द्रविडनं दिली. एनसीएमध्ये या खेळाडूंना वागण्या-बोलण्याचं शिक्षण दिलं जाईल पण या गोष्टी घरी, शाळेमध्ये, ड्रेसिंग रुममध्ये आणि राज्य स्तरावरही झाल्या पाहिजेत, असं द्रविडला वाटतं.
माणसांकडून चुका होतात, दादाकडून हार्दिक-राहुलची पाठराखण
खेळाडू वेगवेगळ्या संघामधून येतात आणि त्यामुळे त्यांची जबाबदारी निश्चित करण्यात यावी. असे मुद्दे कायमच राहतील पण खेळाडूंना शिक्षण द्यावं लागेल आणि त्यांचं मार्गदर्शन करावं लागेल. तुम्ही यंत्रणांना दोष देऊ शकत नाही, असं खेळाडूंना सांगावं लागेल, असं वक्तव्य द्रविडनं केलं.
मी या सगळ्या गोष्टी कर्नाटक टीममधल्या वरिष्ठांकडून, माझ्या पालक आणि प्रशिक्षकांकडून शिकलो. कोणीही मला बसवून याबद्दलचं व्याख्यान दिलं नाही. मी या सगळ्या गोष्टी बघितल्या आणि शिकलो, असं द्रविड म्हणाला.
भूतकाळातही अशा घटना घडल्याचं विसरलं जातंय. सध्या या गोष्टी जास्त प्रमाणावर प्रकाशझोतात येतात. त्यामुळे खेळाडूंना सल्ला द्यावा आणि त्यांना मार्गदशन करावं कारण सध्या खेळाडूंपुढे मैदानातली आणि मैदानाबाहेरची आव्हानं वेगळी आहेत. भारती खेळाडू म्हणून त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्यांची जाणीव असली पाहिजे. आधी सगळं चांगलं होतं आणि आताच सगळं बिघडलं आहे, असं नाही अशी प्रतिक्रिया द्रविडनं दिली.