लाहोर : अमेरिका दौऱ्यावर असताना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केलेल्या वक्तव्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सारवासारव केली आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानची कामगिरी खराब झाली. यानंतर पुढच्या वर्ल्ड कपपर्यंत पाकिस्तानला सर्वोत्कृष्ट टीम बनवू, असा विश्वास इम्रान खान यांनी व्यक्त केला. यानंतर पंतप्रधान इम्रान खान पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या कामकाजात दखल देत नाहीत, असं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रिकेट बोर्डामध्ये सरकारी हस्तक्षेपामुळे आयसीसीने झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डावर बंदी घातली आहे. यानंतर इम्रान खान यांनी पाकिस्तान क्रिकेटविषयी केलेल्या वक्तव्यामुळे नुकसान होऊ नये म्हणून आता यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने प्रतिक्रिया दिली आहे.


'पाकिस्तानी पंतप्रधान किंवा सरकार पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या कामकाजात दखल देत नाही. बोर्ड आपल्या संविधानानुसार स्वतंत्र काम करतं. पंतप्रधान म्हणून इम्रान खान बोर्डाचे संरक्षक आहेत. ते स्वत: एक महान क्रिकेटपटू होते. त्यांचं मत महत्त्वाचं आहे. इम्रान खान यांनी पाकिस्तान क्रिकेटसाठीचा आपला आराखडा बोर्डासमोर ठेवला आहे, पण हादेखील फक्त सल्ला आहे. पाकिस्तान बोर्डाचं व्यवस्थापन याचे निर्णय घेत आहे,' असं स्पष्टीकरण पीसीबीने दिलं आहे.


'भविष्यात जे निर्णय होतील, ते देशातल्या क्रिकेटमध्ये प्रगती करण्यासाठी स्वतंत्रपणे घेतले जातील. क्रिकेट बोर्डामध्ये सरकारी हस्तक्षेप आहे म्हणणं चुकीचं आहे,' असं पीसीबीकडून सांगण्यात आलं.