नवी दिल्ली : आयएएएफ चॅम्पियनशीपमध्ये सुवर्ण पदक जिंकून इतिहास घडवणाऱ्या हिमा दासवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मुळची आसामची असलेल्या हिमा दासचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही कौतुक केलं. पंतप्रधान सध्या दोन दिवसांच्या उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत. आझमगडमध्ये मोदींनी ३४० किमी पूर्वांचल एक्स्प्रेस वेचं भूमीपूजन केलं. यावेळी केलेल्या भाषणादरम्यान मोदींनी हिमा दासची स्तुती केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका छोट्या गावातून आलेली शेतकऱ्याची मुलगी हिमा १८ महिन्यांपूर्वी जिल्हा स्तरावर खेळत होती. पण आता जागतिक स्तरावर तिनं इतिहास घडवून देशाचा गौरव वाढवला आहे, असं वक्तव्य मोदींनी केलं.


याआधी मोदींनी ट्विटरवर हिमाचा एक व्हिडिओ शेअर केला. हा विजय कधीही न विसरता येणार नाही. जिंकल्यानंतर तिचं तिरंग्यासाठी पळणं आणि राष्ट्रगीतावेळी भावूक होणं मलाही भावूक करून गेलं. कोणत्याही भारतीयाच्या डोळ्यात हे बघून अश्रू येतील, असं ट्विट मोदींनी केलं.



देशभरातून होणाऱ्या कौतुकानंतर हिमानंही सगळ्यांना धन्यवाद दिले आहेत. राष्ट्रपती, पंतप्रधान आणि खेळमंत्र्यांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे मला चांगलं वाटलं. तुमचे आशिवार्द असेच कायम ठेवा. देशाला आणखी एक पाऊल पुढे नेण्याचा प्रयत्न करेन, असं हिमा म्हणाली. हिमानं ४०० मीटर स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकलं. या स्पर्धेमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदक जिंकणारी हिमा पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.