Prakhar Chaturvedi NOT Out 400 : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने कूचबिहार ट्रॉफीच्या अंडर-19 देशांतर्गत स्पर्धेचं आयोजन केलं होतं. या स्पर्धेचा अंतिम सामना सोमवार 15 जानेवारी रोजी कर्नाटकातील केएससीए मैदानावर आयोजित करण्यात आला होता. या सामन्यात कर्नाटकच्या फलंदाजाने रेकॉर्डची मोडतोड केल्याचं पहायला मिळालं. मुंबईविरुद्ध खेळताना कर्नाटकचा फलंदाज प्रखर चतुर्वेदीने इतिहास रचला अन् 404 धावांची नाबाद खेळी केली. प्रखरने आपल्या डावात 637 चेंडूंचा सामना केला आणि 46 चौकार आणि 4 खणखणीत षटकार खेचले आहेत. त्याच्या या दमदार खेळीमुळे कर्नाटकला 890 धावांचा डोंगर उभारता आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्नाटकातील केएससीए मैदानावर प्रथम फलंदाजी करताना मुंबईने पहिल्या डावात 380 धावा केल्या होत्या. यामध्ये मुंबईकडून आयुष महात्रे याने 145 धावांची खेळी केली. तर आयुष सचिनने 73 धावांचं मोलाचं योगदान दिलं. तर कर्नाटककडून हार्दिक राजने चार विकेट घेतल्या होत्या. मुंबईच्या डावानंतर कर्नाटक लवकर बाद होईल, असं वाटत होतं. मात्र, प्रखर चतुर्वेदीने दांडपट्टा चालवला अन् चौफेर फटकेबाजी केली.  सलामीवीर प्रखर चतुर्वेदी आणि कार्तिक एस. यूने पहिल्या विकेटसाठी 109 धावांची भागीदारी केली. त्यानंतर कार्तिक बाद झाला. त्यानंतर आलेल्या हर्षिल धर्मानी याने प्रखरची साथ देत 169 धावांची जोरदार खेळी केली.



प्रखर हा कूचबिहार ट्रॉफीच्या अंडर-19 देशांतर्गत स्पर्धेतील फायनलमध्ये सर्वात मोठी खेळी करणारा फलंदाज ठरला आहे. प्रखरने वर्ल्ड कप स्टार युवराज सिंगचा रेकॉर्ड मोडला आहे. युवराजने 1999 मध्ये जमशेदपूर विरुद्ध बिहार या सामन्यात 358 धावांची धुंवाधार खेळी केली होती. तर प्रखरच्या या खेळीमुळे ब्रायन लाराच्या 400 धावांच्या खेळीची सर्वांना आठवण आली आहे.


कर्नाटकची प्लेईन इलेव्हन - प्रखर चतुर्वेदी, कार्तिक एस यू, हर्षिल धर्मानी, कार्तिकेय के पी, समित द्रविड, ध्रुव प्रभाकर, धीरज गौडा, हार्दिक राज, युवराज अरोरा, समर्थ एन, अगस्त्य एस राजू.


मुंबईची  प्लेईन इलेव्हन - अवैस खान, आयुष म्हात्रे, नूतन, मनन भट्ट, तनिश मेहेर, आयुष सचिन वर्तक, अभिज्ञान कुंडू, प्रतीक यादव, प्रेम देवकर, आकाश पवार, यासीन शेख.