कोट्यवधी खर्च करणाऱ्या कोलकात्याला टेन्शन, या खेळाडूच्या सहभागावर प्रश्न
आयपीएल सुरु व्हायच्या आधीच कोलकात्याला धक्का लागणार?
मुंबई : आयपीएलच्या २०२० सालासाठीचा लिलाव गुरुवारी कोलकात्यात पार पडला. या लिलावात पॅट कमिन्स हा सगळ्यात महागडा क्रिकेटपटू ठरला. कोलकात्याने कमिन्सला १५.५० कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं. कमिन्ससोबतच कोलकात्याने इतर खेळाडूंवरही बोली लावून कोट्यवधी रुपये खर्च केले. पण आता कोलकात्याच्या टीमचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर येत आहे.
कोलकात्याने ४८ वर्षांच्या प्रविण तांबेला २० लाख रुपये देऊन विकत घेतलं. याचसोबत प्रविण तांबे हा आयपीएल इतिहासात बोली लागलेला सगळ्यात जास्त वय असलेला खेळाडू ठरला. पण आता प्रविण तांबेच्या आयपीएल सहभागाविषयीच प्रश्न उपस्थित होत आहेत.
प्रविण तांबे याने शारजाहमध्ये झालेल्या टी-१० लीगमध्ये सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत तांबेने हॅट्रिकही घेतली होती. टी-१० लीगच्या पहिल्याच मॅचमध्ये तांबेने इयन मॉर्गन, कायरन पोलार्ड, फॅबियन एलन यांच्यासारख्या दिग्गजांची विकेट घेऊन हॅट्रिक घेतली. याच ओव्हरमध्ये तांबेने क्रिस गेलची आणि पुढच्या ओव्हरमध्ये उपुल थरंगाला माघारी धाडलं. प्रविण तांबेने २ ओव्हरमध्ये १५ रन देऊन ५ विकेट घेतल्या होत्या.
बीसीसीआयच्या नियमांनुसार कोणताही भारतीय खेळाडू जगभरातल्या टी-१० आणि टी-२० लीगमध्ये सहभागी होऊ शकत नाही. खेळाडू काऊंटी क्रिकेटमध्ये, तीन दिवसीय किंवा चार दिवसीय क्रिकेट स्पर्धांमध्ये सहभाग घेऊ शकतात, पण यासाठी बीसीसीआयची परवानगी घेणं आवश्यक आहे.
प्रविण तांबेने टी-१० लीगमध्ये घेतलेल्या सहभागाची गंभीर दखल घेतली जाईल. यानंतर तांबेवर कारवाई करायची का नाही, याबाबत निर्णय होईल, असं आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी सांगितलं. प्रविण तांबेवर बीसीसीआयने कारवाई करण्याचा निर्णय घेतला तर मात्र त्याला आयपीएलला मुकावं लागू शकतं.
४१व्या वर्षी प्रविण तांबेने आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. राहुल द्रविडच्या नेतृत्वात प्रविण तांबे राजस्थानकडून खेळला होता. यानंतर तो गुजरात आणि हैदरबादच्या टीममध्येही होता.
२०१३ साली तांबेने राजस्थानकडून ३ मॅच खेळल्या. २०१३-१४ सालच्या चॅम्पियन्स लीगमध्ये तांबेने ५ मॅचमध्ये १२ विकेट घेतल्या. त्या मोसमातला तांबे हा सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू होता. आयपीएल २०१४ मध्ये तांबेने १३ मॅचमध्ये १५ विकेट पटकावल्या. २०१४ सालीच तांबेने कोलकात्याविरुद्ध हॅट्रिकही घेतली होती.
२०१५ साली प्रविण तांबेने राजस्थानकडून १० मॅच खेळल्या आणि ७ विकेट घेतल्या. यानंतर राजस्थानचं २ वर्षांसाठी निलंबन झालं. त्यामुळे गुजरातने तांबेला विकत घेतलं. गुजरातकडून खेळताना सुरेश रैनाच्या नेतृत्वात तांबेने ७ मॅचमध्ये ५ विकेट घेतल्या. यानंतर तांबे हैदराबादच्या टीममध्ये गेला, पण हैदरबादने त्याला खेळवलं नाही.
प्रविण तांबेने आयपीएलच्या ३८ मॅचमध्ये ३०.४६ ची सरासरी आणि ७.७५ च्या इकोनॉमी रेटने २८ विकेट घेतल्या आहेत. २०१३ साली आयपीएल खेळल्यानंतर तांबेने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्याने मुंबईकडून २ प्रथम श्रेणी आणि ६ लिस्ट ए मॅच खेळल्या होत्या.