नवी दिल्ली : पहिले प्रथम श्रेणी क्रिकेट मग अंडर १९ वर्ल्ड कप आणि आता आयपीएल. पृथ्वी शॉचा क्रिकेटमध्ये बोलबाला सुरूच आहे. पहिल्यांदा आयपीएल खेळणारा पृथ्वी शॉ दिल्लीच्या टीमचा सदस्य आहे. आयपीएलमध्ये शॉनं आत्तापर्यंत ५ मॅचमध्ये २०५ रन केले आहेत. यामध्ये पृथ्वीचा सर्वाधिक स्कोअर ६५ रन आहे. ४१ची सरासरी आणि १७०.८३च्या स्ट्राईक रेटनं पृथ्वी शॉनं या रन केल्या आहेत. आयपीएलमध्ये खेळलेल्या ५ मॅचपैकी २ मॅचमध्ये शॉनं अर्धशतकं केली आहेत. हैदराबादविरुद्धच्या मॅचमध्ये पृथ्वी शॉनं ३६ बॉलमध्ये ६५ रन केले. शॉच्या या खेळीमध्ये ६ फोर आणि ३ सिक्सचा समावेश होता. शॉच्या या शानदार खेळीनंतरही हैदराबादनं दिल्लीचा पराभव केला. या पराभवाबरोबरच दिल्लीच्या प्ले ऑफला क्वालिफाय व्हायच्या आशा आता जवळपास संपुष्टात आलेल्या आहेत.


रेकॉर्ड बनवतोय पृथ्वी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रथम श्रेणी क्रिकेट खेळताना पृथ्वी शॉनं अनेक रेकॉर्ड केले आहेत. सचिन तेंडुलकरच्या काही रेकॉर्डशीही पृथ्वीनं बरोबरी केली आहे. तेव्हापासून शॉची तुलना सचिन तेंडुलकरशी होत आहे. भारताला अंडर १९ क्रिकेट वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या पृथ्वी शॉनं आयपीएलमध्येही शानदार रेकॉर्ड केलं आहे. आयपीएलमध्ये सगळ्यात लहान वयात अर्धशतक बनवण्याच्या रेकॉर्डशी शॉनं बरोबरी केली आहे. संजू सॅमसन आणि पृथ्वी शॉ हे आयपीएलमध्ये सर्वात लहान वयात अर्धशतक करणारे खेळाडू आहेत.


दिल्लीनं शॉला विकत घेतलं


यंदाच्या आयपीएल लिलावामध्ये दिल्लीनं पृथ्वी शॉला विकत घेतलं. आयपीएल लिलावामध्ये शॉची बेस प्राईज २० लाख रुपये एवढी होती पण दिल्लीनं शॉला टीममध्ये घेण्यासाठी १.२० कोटी रुपये मोजले.


अंडर १९मध्येही शॉचं रेकॉर्ड


पृथ्वी शॉ अंडर १९ क्रिकेट वर्ल्ड कप जिंकणारा सर्वात लहान वयातला कर्णधार आहे. पृथ्वी शॉनं १८ वर्ष ८६ दिवसांचा असताना अंडर १९ वर्ल्ड कप जिंकला. अंडर १९ वनडे टीमचा कर्णधार म्हणून १०० टक्के विजय मिळवण्याच्या रेकॉर्डशीही शॉनं बरोबरी केली आहे. पृथ्वी शॉ आणि विराट कोहलीनं ११ पैकी ११ मॅच जिंकल्या आहेत.


रणजीमध्येही शानदार प्रदर्शन


पृथ्वी शॉची तुलना ही नेहमीच क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरशी होते. मागच्या वर्षी रणजी ट्रॉफी खेळताना पृथ्वी शॉ हा १८ वर्षांच्या वयामध्ये सर्वाधिक शतक लगावणारा बॅट्समन बनला आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक लगावणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये शॉ दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. पृथ्वी शॉच्या पुढे आता फक्त सचिन तेंडुलकर आहे. सचिननं या वयात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ७ शतकं लगावली आहेत.