PKL 11: अजित चव्हाणच्या चढाया, रोहित राघवची सर्वोत्तम राखीव खेळाडूची (सुपर सब) खेळी आणि अखेरच्या सेकंदाला चढवलेल्या लोणच्या जोरावर यु मुम्बाने आघाडीच्या हिंदोळ्यावर झुलणाऱ्या सामन्यात पाटणा पायरट्स संघावर ४२-२० अशी दोन गुणांनी मात केली.  सामन्यातील सर्वोत्तम रंगतदार क्षण अखेरच्या १० मिनिटांत बघायला मिळाले. पूर्वार्धात २१-२४ अशा तीन गुणांनी पिछाडीवर राहिल्यानंतर उत्तरार्धात देवांकच्या दमदार चढायांच्या जोरावर एकवेळ पाटणा पायरट्सने सामन्याचे चित्र पालटवले होते. मात्र, त्यांना आघाडीचा फरक वाढवण्यात अपयश आले हे नाकारता येणार नाही. देवांक आणि आयनला संघातील इतर खेळाडूंकडून काहीच साथ मिळाली नाही. विशेषतः बचावाच्या आघाडीवर पाटणा संघाला फार मोठी कामगिरी करता आली नाही. अर्थात, मुंम्बा संघासाठी देखिल काही वेगळे चित्र नव्हते. एकट्या अजित चव्हाणच्या (१९ गुण) तुफानी चढायांनी मुम्बाचा विजय साकार केला हे आकडेवारीत दिसत असले, तरी रोहित राघवची सुपर सब म्हणून झालेली निवड सर्वात निर्णायक ठरली. प्रशिक्षकांची ही खेळी खूपच महत्वाची ठरली. सामन्याला तीन मिनिट असताना यु मुम्बा ३३-३७ असे चार गुणांनी पिछाडीवर असताना रोहित मैदानात उतरला. त्यानंतर त्याने चढाईत एक आणि नंतर पकडीचा गुण घेत गुणफलक ३७-३६ असा कमी केला. हा सामन्याला सर्वात कलाटणी देणारा क्षण होता. 


कसा रंगला सामना? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामन्याला एक मिनिट शिल्लक असताना ३८-३७ अशी एका गुणाची आघाडी पाटणा संघाकडे होती. मात्र, त्यांच्या अंगणात केवळ तीन खेळाडू होते. अव्वल पकड हाच एकमेव त्यांच्याकडे पर्याय उरला होता. मात्र, कमालीच्या उर्जेने खेळणाऱ्या अजित चव्हाणने या वेळी अचूक चढाई करून एक गुण मिळवून ३८-३८ अशी बरोबरी साधली. अखेरच्या ६० सेकंदाच्या खेळात कमालीच्या वेगवान चढाया झाल्या. त्या वेळी अखेरच्या ४२ व्या सेकंदाला सोमबीरने पाटणाच्या संदीपला पकडण्याची घोडचूक केली आणि पाटणाला यामुळे ४०-३८ अशी आघाडी मिळवली. अत्यंत वेगात आलेल्या अजित चव्हाणने दोन खेळाडूत यशस्वी चढाई करून सामना ४०-३९ अशा अवस्थेत आणला. विशेष म्हणजे या वेळी पाटणा लोणच्या कात्रीत सापडले. त्यांच्याकडे केवळ एकच खेळाडू उरला होता. त्यामुळे त्याला गुण मिळवूनच परतायचे होते. त्या वेळी बोनससाठी प्रयत्न करणाऱ्या संदीपचा अचूक चवडा काढून झाफरदानेशने मुंम्बाचा विजय निश्चित केला. पाटणा संघावर अखेरच्या सेकंदाला लोण देण्यात मुम्बाला यश आल्याने मुम्बाकडे ४०-४२ अशी आघाडी राहिली आणि याच स्थितीत सामन्याची वेळ संपली.


 



संपूर्णपणे अजित चव्हाण विरुद्ध देवांक असाच हा सामना झाला. दोघांच्या चढायांनी सामन्यांतील रंगत वाढवली होती. अजितने १९ गुणांची कमाई केली, तर देवांकने १५ गुण मिळविले. अजितला मनजितची (५ गुण), तर देवंकला आयनची (८) थोडीफार साथ मिळाली. बचावपटूंना आलेले अपयश दोन्ही संघांसाठी डोकेदुखी ठरले.


 



त्यापूर्वी पूर्वार्धात यु मुम्बाने अजित चव्हाणच्या चढायांच्या जोरावर आपले वर्चस्व राखले होते. पाटणा संघाही देवांकच्या चढाईच्या जोरावर आव्हान राखून होता. दिल्ली विरुद्धच्या विजयात मंगळवारी सुरेख बचाव करणाऱ्या सुनिल कुमारला आज साफ अपयश आले. रिंकु नरवालही अपयशी ठरला. दोघांच्या पाच पकडी चुकल्या. याचा फटका मुम्बाला बसणे अपेक्षित होते. पण, प्रतिस्पर्धी पाटणा संघालाही बचावाच्या आघाडीवर फारसे यश आले नाही. त्यामुळे मध्यंतराला मुम्बा संघ आघाडी मिळविण्यात यशस्वी ठरला होता.