मुंबई : भारत आणि इंग्लंडमध्ये शेवटची आणि तिसरी वनडे मॅच १७ जुलैला खेळवण्यात येणार आहे. या मॅचनंतर ५ टेस्ट मॅचच्या सीरिजला सुरुवात होणार आहे. १ ऑगस्टला या सीरिजची पहिली टेस्ट मॅच खेळवण्यात येईल.  इंग्लंड लायन्सविरुद्ध भारताचा अ संघ शेवटची मॅच खेळणार आहे. १६ जुलैपासून या मॅचला सुरुवात होणार आहे. इंग्लंड लायन्सविरुद्धच्या मॅचवेळी किंवा नंतर भारतीय टेस्ट टीमची निवड होऊ शकते. या मॅचमधल्या भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवरही निवड समितीचं लक्ष असणार आहे.


कोणाला संधी मिळणार?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी विराट कोहली, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, मुरली विजय, लोकेश राहुल, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, उमेश यादव, इशांत शर्मा, चेतेश्वर पुजारा यांची टीममधली निवड जवळपास निश्चित आहे.


या खेळाडूंनी डोकेदुखी वाढवली


काही खेळाडूंची निवड निश्चित असली तरी महत्त्वाच्या खेळाडूंनी मात्र कोहली आणि निवड समितीची डोकेदुखी वाढली आहे. गेल्या काही महिन्यांपासून वनडे आणि टी-२० मध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहलला संधी देण्याचे संकेत विराटनं दिले आहेत. जर कुलदीप-चहलला टीममध्ये घेतलं तर अश्विन आणि जडेजाचं टेस्ट टीममधलं स्थान धोक्यात येऊ शकतं.


दुखापतींचं ग्रहण


या सीरिजआधी भारताला दुखापतीचंही ग्रहण लागलं आहे. भुवनेश्वर कुमारची पाठ दुखत असल्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० मॅचनंतर तो खेळलेला नाही. तर जसप्रीत बुमराहच्या बोटाला दुखापत झाल्यामुळे तो टी-२० आणि वनडे सीरिजला मुकला आहे. टेस्ट सीरिजसाठी या दोघांची निवड झाली नाही तर भारताला मोठा धक्का बसू शकतो.


भारताचा टेस्ट टीमचा विकेट कीपर वृद्धीमान सहालाही दुखापतीनं ग्रासलं आहे. त्यामुळे सहाऐवजी दिनेश कार्तिक आणि भारताच्या अ संघामध्ये असलेल्या ऋषभ पंतची टीममध्ये निवड होऊ शकते. मोहम्मद शमी यो-यो टेस्टमध्ये पास झाला आहे. पण गेल्या काही दिवसांमध्ये शमीच्या वैयक्तिक आयुष्यात वाद निर्माण झाले. त्यामुळे तो मानसिकदृष्ट्या फिट असेल का हे देखील निवड समितीला पाहावं लागणार आहे.