पुलवामा हल्ला : बीसीसीआय शहिदांच्या कुटुंबांना मदत करणार
पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले.
मुंबई : पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले. या शहिदांच्या कुटुंबियांच्या मदतीला देशातली सगळ्यात श्रीमंत क्रीडा संघटना धावली आहे. या हल्ल्यात शहीद झालेल्यांच्या कुटुंबाला किमान ५ कोटी रुपयांची रक्कम द्यायला हवी, असं बीसीसीआयचे कार्यकारी अध्यक्ष सी.के.खन्ना यांनी म्हणलं आहे. या मागणीचं पत्र त्यांनी प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय यांना पाठवलं आहे. तसंच राज्यांच्या क्रिकेट संघटना आणि आयपीएल टीमनाही मदतीचं आवाहन सी.के.खन्ना यांनी स्वतःच्या अधिकारात केलं आहे.
इराणी करंडक स्पर्धेतल्या बक्षिसाची २५ लाखांची रक्कम विदर्भ क्रिकेट संघानं यापूर्वीच शहिदांच्या कुटुंबीयांना देऊ केली आहे. दुसरीकडे माजी कसोटीपटू विरेंद्र सेहवागने आपल्या शाळेमध्ये शहिदांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्यात येईल, असं जाहीर केलं आहे. तसंच भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यानंही शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलला आहे. दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या १०० मुलांना मदत करणार असल्याचे गंभीरने सांगितले आहे. याआधी देखील गौतमने ५० मुलांना आपल्या संस्थेच्या माध्यमातून मदत केली आहे. त्यानंतर आता आर्थिक सुबत्ता असलेली बीसीसीआय मदत करणार का आणि किती हे पाहणं औत्सुक्याचं आहे.