ग्वांगझू(चीन) : भारतीय बॅडमिंटन स्टार पी. व्ही. सिंधूनं वर्ल्ड टूर फायनल्सचं अजिंक्यपद पटकावलं आहे. अंतिम फेरीत सिंधूनं नोझोमी ओकुहारावर मात केली. २१-१९, २१-१७ नं सिंधूनं आपला अंतिम फेरीचा सामना जिंकला. वर्ल्ड टूर फायनल्स जिंकणारी ती पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली. २०१८ मधील सिंधूचं हे पहिलं अजिंक्यपद ठरलंय. या विजेतेपदासह सिंधूनं २०१८ च्या मोसमाचा शेवट हा सुवर्णपदकाची कमाई करत केलाय. आता २०१९ मध्ये सिंधूनं याच कामगिरीची पुनरावृत्ती करावी अशी अपेक्षा तिच्या चाहत्यांना असणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पी.व्ही.सिंधूनं ग्रुप स्टेजमध्ये तिन्ही मॅच जिंकून सेमीफायनल गाठली होती. सिंधूनं ग्रुप स्टेजमध्ये तायवानची ताय जू यिंग, जपानची अकाने यामागुची आणि अमेरिकेच्या बीवेन झेंग यांना हरवलं. यानंतर सेमी फायनलमध्ये सिंधूनं थायलंडच्या रतचानोक इंतानोनचा पराभव केला.


जागतिक क्रमकावारीत सहाव्या क्रमांकावर असणाऱ्या सिंधूनं महिला फायनलमध्ये जपानच्या नोझोमी ओकुहाराला दोन सेटमध्ये मात दिली. एक तास आणि दोन मिनीट चाललेल्या या स्पर्धेमध्ये सिंधूनं जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असलेल्या ओकुहारावर विजय मिळवला.


मागच्या वर्षी ओकुहारानं वर्ल्ड चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये सिंधूचा पराभव केला होता. या पराभवाचा बदला सिंधूनं यावर्षी घेतला आहे. सिंधू आणि ओकुहारा यांच्यामध्ये एकूण १३ मॅच झाल्या आहेत. यातल्या ७ मॅचमध्ये सिंधूचा विजय झाला तर ६ मॅचमध्ये तिला पराभवाचा सामना करावा लागला.