...अन् संतापलेल्या धोनीने मालिका सुरु असतानाच श्रीसंतला घरी पाठवायचं ठरवलं; अश्विनने पहिल्यांदाच केला खुलासा
कॅप्टन कूल म्हणून ओळखला जाणारा महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) एकदा श्रीसंतवर प्रचंड संतापला होता. यानंतर त्याने श्रीसंतला (S Sreesanth) दक्षिण आफ्रिका मालिका सुरु असताना मध्यातूनच घरी पाठवण्याचं ठरवलं होतं असा खुलासा आर अश्विनने (Ravichandran Ashwin) केला आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा फिरकीपटू आर अश्विने (Ravichandran Ashwin) याने आपल्या आत्मतरित्रातून अनेक अशा गोष्टींचा उलगडा केला आहे, ज्यांची कोणाला माहिती नाही. 'I Have The Streets- A Kutty Cricket Story' असं त्याच्या 184 पानांच्या आत्मचरित्राचं नाव असून वरिष्ठ पत्रकार सिद्धार्थ मोंगा हे सह-लेखक आहेत. यामधून त्याने आपला क्रिकेटमधील प्रवास उलगडला आहे, ज्यामध्ये वर्ल्डकप 2011 पर्यंतचा उल्लेख आहे. यातच त्याने खुलासा केला आहे की, कॅप्टन कूल म्हणून ओळखला जाणारा महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) एकदा श्रीसंतवर प्रचंड संतापला होता. यानंतर त्याने श्रीसंतला (S Sreesanth) दक्षिण आफ्रिका मालिका सुरु असताना मध्यातूनच घरी पाठवण्याचं ठरवलं होतं.
आर अश्विनने पुस्तकातून खुलासा केला आहे की, एकदा कशाप्रकारे संतापलेल्या धोनीने 2010 मध्ये त्याला टीम मॅनेजर रणजीह बिस्वालला श्रीसंतसाठी घरी जाण्याचं तिकीट बूक कऱण्यास सांगितलं होतं.
नेमकं काय झालं होतं?
श्रीसंतला धोनीने ड्रेसिंग रुममध्ये राखीव खेळाडूंसह मसाजसाठी डग-आऊटमध्ये बसण्यास सांगितलं होतं. पण तो वारंवार याकडे दुर्लक्ष करत होता. "मी पाणी घेऊन जात होतो आणि धोनी पीत होता. दोन ओव्हर्सनंतर मी पुन्हा पाणी नेलं आणि तो पुन्हा प्यायला. मी इतर कोणापेक्षाही जास्त वेळा धोनीसाठी पाणी नेलं आहे. मी जेव्हा ड्रिंक ब्रेकदरम्यान गेलो तेव्हा मला धोनीने श्री कुठे आहे असं विचारलं. धोनी अशाच प्रकारे एखादी विचारणा करत आहे. तो हे नेमकं का विचारत आहे हे समजत नाही. मला त्याला काय उत्तर द्यावं हे समजत नव्हतं, कारण पुढे काय होईल याची कल्पना नव्हती. पण धोनीने मला शोधण्यास सांगितलं," अशी माहिती आर अश्विनने दिली आहे.
पुढे त्याने सांगितलं आहे की, "मी त्याला श्री ड्रेसिंग रुममध्ये असल्याचं सांगितलं. धोनाने मला त्याला राखीव खेळाडूंसह खाली बसायला सांग असा निरोप दिला. मी परत जाताना इतक्या महत्वाच्या सामन्यात विकेटकिपिंग करत असतानाही धोनीने श्रीसंत जागेवर नाही हे कसं काय पाहिलं असा विचार करत होतो. मी विजयला श्रीसंतला धोनीने खाली यायला सांगितलं आहे असं सांगितलं. त्यावर त्याने मला तू जाऊन सांग, माझ्याकडून ही अपेक्षा ठेवू नकोस म्हटलं. मी चेंजिंग रुममध्ये जाऊन श्रीसंतला सांगितलं, धोनीने तुला खाली बोलवलं आहे. त्यावर त्याने कशाला? तू ड्रिंक घेऊन जाऊ शकत नाहीस का? असं उत्तर दिलं".
"मी त्याला सांगितलं की, मी काहीच सांगितलेलं नाही. त्यानेच तुला खाली बोलावलं असून, राखीव खेळाडू एकत्र हवेत असं म्हटलं आहे. त्यावर त्याने मला तू खाली जा, मी येतो असं उत्तर दिलं. यानंतर मी पुन्हा ड्रिंकच्या कामाला लागलो. पुढच्या वेळी मला हेल्मेट घेऊन जायचं होतं. यावेळी धोनी चिडलेला होता. मी त्याला इतकं रागावलेलं कधी पाहिलेलं नव्हतं. श्री कुठे आहे? तो काय करतोय? असं त्याने विचारलं. मी त्याला तो मसाज घेत आहे असं सांगितलं. त्यावर धोनी काही बोलला नाही. पुढच्या ओव्हरला त्याने हेल्मेट नेण्यासाठी मला बोलावलं. यावेळी तो शांत होता. त्याने मला हेल्मेट देताना सांगितलं की, रणजीब सरांकडे जा आणि त्यांना श्री येथे खेळण्यास उत्सुक नाही. त्याचं भारतात परत जाण्याचं तिकीट बूक करा असा निरोप दिला. मला आश्चर्य वाटलं. मला काय बोलावं कळत नव्हतं. मी फक्त धोनीच्या चेहऱ्याकडे पाहत होतो. तो म्हणाला काय झालं? तुला इंग्रजी समजत नाही का?", असं अश्विनने सांगितलं आहे.
पण यानंतर श्रीसंत लगेच खाली आला. इतकंच नाही तर तो ड्रिंक ड्युटीवरही आला. जेव्हा धोनीला ड्रिंक हवं होतं तेव्हा तोच मैदानात जात होते. धोनीने त्याच्याकडून ड्रिंक घेण्याऐवजी मला बोलावलं. तू रणजीब सरांना सांगितलं का? अशी विचारणा त्याने केली. यानंतर धोनी आणि श्रीसंत यांनी तो वाद मिटवला. पण मी हसायचं की घाबरायचं अशा स्थितीत अडकलो होतो असा खुलासा आर अश्विनने केला.