आर अश्विनला संन्यास घेण्यास भाग पाडलं? वडिलांचा धक्कादायक आरोप, म्हणाले `त्याला सतत अपमानित करुन...`
R Ashwin Retirement : रविचंद्रन यांनी धक्कादायक खुलासा करत अश्विनना अपमानित करून त्याला सन्यास घेण्यास भाग पाडण्यात आलं असा आरोप केला आहे.
R Ashwin Father On Retirement : भारताचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विन याने बुधवारी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India VS Australia) यांच्यातील तिसऱ्या सामन्याच्या शेवटच्या दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली. ३८ वर्षीय अनुभवी गोलंदाजाने अचानक निवृत्तीची घोषणा केल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. अनेकांनी त्याला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. आर अश्विन ( R Ashwin) गुरुवारी लगेचच ऑस्ट्रेलियात असलेल्या भारतीय संघाची साथ सोडून भारतात परतला. चेन्नईत त्याच्या कुटुंबाकडून त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. मात्र दरम्यान वडील रविचंद्रन (Ravichandran) यांनी धक्कादायक खुलासा करत अश्विनना अपमानित करून त्याला सन्यास घेण्यास भाग पाडण्यात आलं असा आरोप केला आहे.
टेस्टमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा दुसरा गोलंदाज :
आर अश्विनने 2010 मध्ये श्रीलंके विरुद्ध वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याचं एकूण क्रिकेट करिअर हे 14 वर्षांचं होतं. अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जरी निवृत्ती घेतली असली तरी तो आयपीएल आणि देशांतर्गत सामन्यांमध्ये खेळताना दिसणार आहे. अनिल कुंबळे यांच्यानंतर सर्वाधिक टेस्ट विकेट्स घेणारा आर अश्विन हा दुसरा भारतीय गोलंदाज आहे. रविचंद्रन अश्विन या भारताच्या स्टार स्पिनरने क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये एकूण 765 विकेट्स घेतले आहेत. आर अश्विनने 106 टेस्टमध्ये 537 विकेट्स आणि 3503 धावा केल्या आहेत. तर वनडेमध्ये त्याने 116 सामन्यात 156 विकेट्स आणि 707 धावा केल्या आहेत. टी 20 मध्ये अश्विनने 65 सामन्यात 72 आणि 31 धावा केल्या आहेत.
हेही वाचा : कोणत्या महालापेक्षा कमी नाही आर अश्विनचं चेन्नईतील आलिशान घर, कार कलेक्शन पाहून थक्क व्हाल
काय म्हणाले वडील रविचंद्रन :
गुरुवारी अश्विन चेन्नई येथील त्याच्या घरी दाखल झाला. अश्विन घरी परतल्यावर त्याचे फॅन्स आणि कुटुंबीय त्याच्या स्वागतासाठी उभे होते. अश्विनचे वडील रविचंद्रन यांनी आपल्या मुलाला घट्ट मिठी मारली तर आई चित्रा या फार भावुक झाल्या होत्या. यावेळी न्यूज 18 हिंदीला दिलेल्या एका मुलाखतीत अश्विनचे वडील रविचंद्रन यांनी सांगितले की, "आम्हाला देखील अश्विनच्या निवृत्तीचा निर्णय शेवटच्या क्षणीच समजला. निवृत्ती घेणं ही त्याची इच्छा होती आणि मी त्यात हस्तक्षेप करू शकत नाही. परंतु ज्या पद्धतीने त्याने निवृत्ती घेतली, त्याला अनेक कारणे असू शकतात. ते फक्त अश्विनला माहीत आहे, कदाचित अपमान हे कारण असावे".
पुढे रविचंद्रन म्हणाले की, "गेली 14-15 वर्षे तो मैदानावर होता. यात काल अचानक झालेला बदल आणि त्याने घेतलेली निवृत्ती याने आम्हाला खरोखरच एक प्रकारचा धक्का दिला. त्याचवेळी त्याचा सतत अपमान होत असल्याने आम्ही देखील यापूर्वी अशी अपेक्षा करत होतो की अश्विन या सगळ्या गोष्टीअजून किती दिवस सहन करू शकतो? बहुदा यासगळ्यामुळे त्याने स्वतःहून हा निर्णय घेतला असेल'. आर अश्विनच्या वडिलांनी केलेल्या या वक्तव्यामुळे आता क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे.