Rahul Dravid Team India Head Coach: भारतीय क्रिकेट संघाचं या वर्षीचं टाइमटेबल फारच व्यस्त असणार आहे. वर्षाच्या शेवटी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या आधी भारतीय संघ सतत दौऱ्यावर असणार आहे. सध्या सुरु असलेल्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यानंतर भारत आयर्लंडच्या दौऱ्यावरही जाणार आहे. मात्र या दौऱ्यामध्ये मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड नसेल असं सांगितलं जात आहे. द्रविडबरोबरच संघाच्या संपूर्ण सपोर्टींग स्टाफलाही या दौऱ्याला पाठवलं जाणार नसल्याचं कळतं. द्रविडसहीत अनेकांना कायमचा डच्चू मिळणार की काय अशा चर्चांना यामुळे उधाण आलं आहे. सध्या द्रविड भारतीय संघांबरोबर असून सध्या 2 कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेनंतर वेस्ट इंडिजविरुद्धच 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. मात्र पुढील दौऱ्यासाठी द्रविड संघाबरोबर नसेल अशी दाट शक्यता आहे. हे असं का यासंदर्भातील माहिती समोर आली आहे.


...म्हणून द्रविड आणि इतर सहकारी नाही जाणार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय संघाच्या वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर द्रविड आणि इतर सपोर्टींग स्टाफला ब्रेक देण्याचा बीसीसीआय म्हणजेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा विचार आहे. द्रविडऐवजी आयर्लंडच्या दौऱ्यावर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख असलेल्या व्ही. व्ही. एस. लक्ष्मणला भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून पाठवलं जाईल. यापूर्वीही लक्ष्मणने हंगामी प्रशिक्षक म्हणून भारतीय संघाबरोबर परदेश दौरा केला आहे. क्रिकबजने दिलेल्या वृत्तानुसार भारतीय संघाच्या प्रमुख प्रशिक्षकाबरोबरच फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड आणि गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाब्रे सुद्धा वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर ऑगस्ट महिन्यात पुन्हा भारतात येतील असं शक्यता आहे. टीम इंडिया टी-20 मालिकेमधील आपले शेवटचे 2 सामने अमेरिकेत खेळणार आहे. राहुल द्रविड आणि त्याच्या सहकाऱ्यांना आराम देण्यासाठी हे नियोजन करण्यात आल्याचं समजतं. नव्या दमाने राहुल द्रविड आणि प्रशिक्षक टीममधील सहकारी आशिया चषकाआधी भारतीय संघाबरोबर पुन्हा जोडले जातील. आशिया चषक स्पर्धा 31 ऑगस्टपासून सुरु होत आहे.


लक्ष्मणबरोबर हे सुद्धा जाणार


यानंतर भारतीय संघ आशिया चषकानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 एकदिवसीय सामने खेळणार आहेत. त्यानंतर भारतीय संघ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा खेळणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. लक्ष्मणबरोबरच फळंदाजीचे प्रशिक्षक सिंताशु कोटक आणि गोलंदाजी प्रशिक्षक ऋषिकेश कानिटकर यांच्याबरोबर ट्रॉय कूली आणि साईराज बहुतुले यांनाही आयर्लंडच्या दौऱ्यावर पाठवलं जाण्याची शक्यता आहे. 


3 टी-20 सामने खेळवणार


यापूर्वी जून 2022 मध्ये लक्ष्मण प्रशिक्षक म्हणून आयर्लंडच्या दौऱ्यावर गेला होता. त्यावेळेस भारतीय संघ 3 टी-20 मालिका खेळला होता. यंदाही भारतीय संघ 3 टी-20 सामने खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 18 ऑगस्ट रोजी, दुसरा 20 ऑगस्ट रोजी आणि तिसरा 23 ऑगस्ट रोजी खेळवला जाणार आहे. 


पंड्याच्या नेतृत्वाखाली जाणार संघ


आयर्लंडच्या दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड करण्यात आलेली नाही. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालीच भारतीय संघ आयर्लंडच्या दौऱ्यावर जाण्याची शख्यता आहे. मागील दौऱ्यामध्येही पंड्यानेच संघाचं नेतृत्व केलं होतं.