दुबई : क्रिकेटमधला सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या हॉल ऑफ फेममध्ये भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडची वर्णी लागली आहे. आयसीसीनं याची घोषणा केली आहे. हॉल ऑफ फेममध्ये अशा खेळाडूंचा समावेश केला जातो ज्यांनी क्रिकेटमध्ये इतिहास घडवला आहे. यामध्ये राहुल द्रविड आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग यांचा समावेश करण्यात आला आहे. द्रविड आणि पाँटिंगबरोबरच निवृत्त झालेली इंग्लंडची महिला विकेट कीपर बॅट्समन क्लेयर टेलर हिलाही हॉल ऑफ फेममध्ये जागा मिळाली. रविवारी डबलिनमध्ये झालेल्या कार्यक्रमात याची घोषणा करण्यात आली.


द्रविड पाचवा भारतीय खेळाडू 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रतिष्ठित यादीमध्ये समावेश झालेला द्रविड हा पाचवा भारतीय खेळाडू बनला आहे. याआधी बिशन सिंग बेदी, सुनील गावसकर, कपिल देव आणि अनिल कुंबळे यांनाही हा सन्मान मिळाला होता. हा पुरस्कार मिळणारा पाँटिंग हा २५ वा ऑस्ट्रेलियाचा खेळाडू आहे. 


द्रविडची प्रतिक्रिया 


आयसीसीकडून हॉल ऑफ फेममध्ये जागा मिळवणं हा सगळ्यात मोठा सन्मान आहे. अनेक पिढीतल्या सर्वोत्तम खेळाडूंच्या यादीत जाण्याचं स्वप्न क्रिकेट कारकिर्दीमध्ये सगळेच खेळाडू बघतात. माझ्या जवळचे तसंच ज्यांच्याबरोबर मी क्रिकेट खेळलो ते खेळाडू, माझे प्रशिक्षक, अधिकारी, बीसीसीआय आणि केएससीए यांनी माझं नेहमीच समर्थन केलं. या सगळ्यांना मी धन्यवाद देतो, असं द्रविड म्हणाला. राहुल द्रविडनं १६४ टेस्टमध्ये ३६ शतकांसोबत १३,२८८ रन आणि ३४४ वनडेमध्ये १२ शतकांसोबत १०,८८९ रन केल्या आहेत. 


हॉल ऑफ फेम मिळण्याचा नियम 


मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा अजूनही हॉल ऑफ फेममध्ये समावेश झालेला नाही. २००९ साली फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल क्रिकेटर्स असोसिएशननं याची सुरुवात केली होती. फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल क्रिकेटर्स असोसिएशननं याची सुरुवात केली होती. मागच्या ५ वर्षांमध्ये खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नको, असा या सन्मानाचा नियम आहे. राहुल द्रविड सचिनच्या आधीच निवृत्त झाल्यामुळे पहिले द्रविडला हा मान मिळाला. 
सचिन तेंडुलकर नोव्हेंबर २०१३ मध्ये शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच खेळला. तर द्रविडनं जानेवारी २०१२मध्ये शेवटची मॅच खेळली. सचिन तेंडुलकरलाही हा सन्मान द्यायचा आहे पण नियमांमुळे सध्या त्याला हॉल ऑफ फेममध्ये सामील करता येणार नाही, अशी प्रतिक्रिया असोसिएशननं दिली आहे.