भारताने टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) जिंकण्यामध्ये संघातील खेळाडूंसह मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडनेही (Rahul Dravid) अत्यंत मोलाची भूमिका निभावली आहे. राहुल द्रविडमुळे भारतीय संघाने दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्डकपवर आपलं नाव कोरलं आहे. पण या वर्ल्डकपसह राहुल द्रविडचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला आहे. राहुल द्रविडचा प्रशिक्षक म्हणून अखेरचा वर्ल्डकप होता. त्यामुळे आपण आता एका अर्थाने बेरोजगार झाल्याचं राहुल द्रविडने उपहासात्मकपणे म्हटलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2007 मधील एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वातील संघात राहुल द्रविड खेळला होता. या वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ फार लवकर बाहेर पडला होता. राहुल द्रविड संघात असताना एकदाही वर्ल्डकप जिंकू शकला नव्हता. पण अखेर प्रशिक्षकपदी आल्यानंतर त्याचं हे स्वप्न पूर्ण झालं आहे. 2007 च्या वर्ल्डकपमधून अनपेक्षितपणे संघाला बाहेर पडावं लागल्यानंतर या विजयासह त्याने हिशोब पूर्ण केला आहे. 


'मी आता बेरोजगार'


भारताच्या विजयानंतर राहुल द्रविडने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आता आपण बेरोजगार आहोत असं म्हटलं. "मी आता या विजयापासून फार लवकर दूर जाईन अशी आशा आहे. पुढच्या आठवड्यात मी बेरोजगार असेन," असं सांगताना तो हसत होता. पुढे तो म्हणाला की, "मला फार दूरचा विचार करायचा नाही. पण हो, मी लवकर यातून बाहेर पडेन अशी आशा आहे. हेच तर आयुष्य असतं".



2021 च्या विश्वचषकानंतर द्रविडने रवी शास्त्री यांच्या जागी भारताचे मुख्य प्रशिक्षक म्हणून जागा घेतली आहे. द्रविड प्रशिक्षकपदी असताना भारताने 12 महिन्यांत 3 आयसीसी फायनल खेळल्या. टीम इंडियाने गेल्या वर्षी द्रविडच्या प्रशिक्षकदाखालीआशिया चषक ट्रॉफीही जिंकली होती.


द्रविडच्या कार्यकाळात भारताला ऑस्ट्रेलियाकडून दोन आयसीसी फायनलमध्ये पराभव पत्करावा लागला. 2023 वर्ल्डकपमध्ये भारताने जबरदस्त कामगिरी केली. पण संघाला एकमेवर पराभव स्विकारावा लागला आणि तोच दुर्दैवाने अंतिम सामना होता. एका वर्षानंतर, भारतीय संघ एकही सामना न गमावता T20 विश्वचषक जिंकणारा पहिला संघ ठरला.


'मी वारसा शोधत नाही'


"मी वारसा देणारी व्यक्ती नाही, मी वारसा शोधत नाही, मला फक्त आनंद वाटतो की आम्ही आमचे सर्वोत्तम देऊ शकलो. मला वाटतं की मी एक अपवादात्मक व्यावसायिक गट, बुद्धिमान प्रशिक्षक आणि इतर सपोर्ट स्टाफसोबत काम करत आहे. ज्यांनी एक विलक्षण वातावरण तयार करणं शक्य केलं आहे. ट्रॉफी जिंकताना आम्हाला नशिबाचीही साथ लाभली याचा आनंद आहे. संघासाठी मी यापेक्षा जास्त आनंदी होऊ शकत नाही," असं राहुल द्रविड म्हणाला.