राजस्थान आयपीएलमधून बाहेर, कोलकात्याकडून २५ रननी पराभव
कोलकात्याविरुद्धच्या एलिमिनेटरमध्ये राजस्थानचा २५ रननी पराभव झाला आहे.
कोलकाता : कोलकात्याविरुद्धच्या एलिमिनेटरमध्ये राजस्थानचा २५ रननी पराभव झाला आहे. या पराभवाबरोबरच राजस्थानचं आयपीएलमधलं आव्हान संपुष्टात आलं आहे. कोलकात्यानं ठेवलेल्या १७० रनचा पाठलाग करताना राजस्थाननं २० ओव्हरमध्ये ४ विकेट गमावून १४४ रन केल्या. राजस्थानच्या संजू सॅमसननं ३८ बॉलमध्ये सर्वाधिक ५० रन केल्या. तर कर्णधार अजिंक्य रहाणेला ४१ बॉलमध्ये ४६ रन करता आल्या. कोलकात्याकडून पियुष चावलानं सर्वाधिक २ विकेट घेतल्या. तर प्रसिद्ध कृष्णा आणि कुलदीप यादवला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली.
या मॅचमध्ये राजस्थानचा कर्णधार अजिंक्य रहाणेनं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. कोलकात्यानं २० ओव्हरमध्ये ७ विकेट गमावून १६९ रन केल्या. पहिले बॅटिंग करणाऱ्या कोलकात्याची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. ५१ रनवरच कोलकात्याचे चार बॅट्समन आऊट झाले. पण दिनेश कार्तिकनं कोलकात्याची इनिंग सावरली. कार्तिकनं ३८ बॉलमध्ये ५२ रन केले. यामध्ये ४ फोर आणि २ सिक्सचा समावेश होता. तर आंद्रे रसेलनं २५ बॉलमध्ये झटपट ४९ रन केले. रसेलनं ५ सिक्स आणि ३ फोर लगावल्या. राजस्थानकडून कृष्णप्पा गौतम, जोफ्रा आर्चर आणि बेन लॉफ्लिननं प्रत्येकी २-२ विकेट घेतल्या. तर श्रेयस गोपाळला १ विकेट घेण्यात यश आलं.
कोलकात्यापुढे हैदराबादचं आव्हान
एलिमिनेटरमध्ये राजस्थानचा पराभव केल्यानंतर आता कोलकात्याला हैदराबादविरुद्ध क्वालिफायर-२ची मॅच खेळायची आहे. २५ तारखेला ईडन गार्डन मैदानामध्ये हा सामना रंगेल. ही मॅच जो जिंकेल तो फायनलमध्ये चेन्नईशी दोन हात करेल. २७ मे रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आयपीएलची फायनल होणार आहे.