Jos Buttler : तो आला त्यानं पाहिलं अन् जिंकून घेतलं सारं...!
Jos Buttler single handed win For RR : मैदानातले चाहते असो वा समालोचक सगळे स्तब्ध झाले होते. बटलरच्या अंगात काय संचारलं आहे तेच कळेना. बाकी फलंदाजांनी शरणागती पत्करलेली असताना बटलर मात्र अंगणात खेळावं इतक्या सहजतेने कोलकाताला चोपत होता.
Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals : क्रिकेटचं स्वरूप आता बदलत चाललंय. बॉलर्सचं वर्चस्व असलेला खेळ आता फलंदाजांच्या पारड्यात झुकायला लागलंय. त्यातील काही इनिंग स्पेशल असतात. अशीच एक खेळी आज कोलकाताच्या मैदानावर पहायला मिळाली. नाव होतं... जॉस बटलर... संघातील खेळाडूच काय तर खुद्द प्रेक्षकांनी देखील पराभव स्विकारला असताना मैदानात एका योद्धासारखा उभा राहिला तो जॉस बटलर... सलामीला आलेल्या जॉसने संयमीच नाही तर वादळी खेळी करत आपल्या कर्तृत्वाची झलक दाखवून दिली अन् राजस्थान रॉयल्सला एतिहासिक विजय मिळवून दिला. ईडन गार्डनवर लाखो कोलकाताच्या प्रेक्षकांचं मनोरंजन करत बटलरने धमाकेदार शतक ठोकलं अन् नशिबापेक्षा मेहनतचं फळ जास्त गोड असलं, याचा प्रत्यय बटलरने दाखवून दिला.
सामना होता कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांचा... नशिब काढून आलेला सुनील नारायण राजस्थानच्या गोलंदाजांची खरडपट्टी घेत असताना कॅप्टन संजूने जोडीदार म्हणून आलेल्या फलंदाजांना मैदानात टिकून दिलं नाही. याचा परिणाम असा झाला की कोलकाताला अपेक्षेप्रमाणे हैदराबादची झलक दाखवला आली नाही. बॅटिंगचा कस लागणार हे जवळजवळ बटलरच्या लक्षात आलंच असावं. फिटनेसमुळे बाहेर बसलेल्या बटलरला, संजूने आज तरी खेळ म्हणून विनंती केली असावी. मोठ्या सामन्यात बटलरशिवाय राजस्थानचं पान हलणार नव्हतं. पण सामना पेलावा लागणार याची जाण त्याला सुनील नारायणची खेळी पाहूनच आली असावी.
राजस्थानसमोर डोंगराऐवढं आव्हान, त्यामुळे सलामीला आलेल्या कुणालातरी मैदानात खेळावच लागणार होतं. बटलरने सामन्याचा नूर ओळखला अन् शांततेत सुरूवात केली. बॉल बॅटवर कसा येतोय? याचा त्याचा अंदाज आला असावा... तरी राजस्थानला पहिले धक्के बसले. ना जयस्वाल चालला ना संजू... बटलरला गाडा रेटायचा होता... रियान आला.. पाहिलं अन् हाणामारी सुरू केली. पण रियानचा चाबूक शॉट हुकला अन् तो बाद झाला. पुन्हा मैदानात कल्ला... शाहरूख खान सकट सगळेच विजयाच्या मिऱ्या वाटायला लागले. पण त्यांचा बॉस अजूनही मैदानात होता. हेटमायर आला अन् गेला. पॉवेलने कॅरिबियन पावर दाखवली खरी पण नारायणने पुन्हा टाळ कुटले अन् सामन्याचं पारडं फिरवलं. पॉवेल गेला...आता संपलं असं वाटू लागलं. पण चार ओव्हर बाकी असतानाच बटलरने श्रेयसला धडकी भरवली.
बॉल बॉन्ड्रीकडे गेला तरी बटलरने धावला नाही. सामना हुकण्याच्या स्थितीत असताना धोनी अशी टॅक्टिक्स वापरायचा.. पण कधी? पार 19 व्या ओव्हरमध्ये... पण आपल्याला अजून चार ओव्हर खेळून काढायच्यात हे बटलरच्या डोक्यात असावं. सगळं संपत चाललं होतं. पण उरला होता... आत्मविश्वास... पण मला खेळायचंय म्हणत जॉस उभा राहिला अन् बॉलला बॉन्ड्रीचा रस्ता दाखवत राहिला, परिणामाची चिंता त्याने केली नाही. समोर कोणीही असो.. त्यानं सुट्टी दिली नाही. अखेरचा रन निघेपर्यंत बटलर मैदानात टिकला अन् जिंकला सुद्धा...! पराभवाची निराशा पत्करण्यापेक्षा बटलरने जबाबदारीचं ओझं वावरणं पसंत केलं. पण पुन्हा एकदा नेव्हर गिव्ह अपचा धडा शिकवला तो वाघासारखा लढणाऱ्या बटलरने...!