मुंबई : भारतीय महिला टीमच्या नव्या प्रशिक्षकाची घोषणा करण्यात आली आहे. रमेश पोवार हा भारतीय महिला टीमचा नवा प्रशिक्षक असेल. टी-२० वर्ल्ड कपपर्यंत रमेश पोवारची भारतीय टीमचा प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. तुषार अरोठे यांनी राजीनामा दिल्यानंतर रमेश पोवारला भारतीय महिला टीमचा अंतरिम प्रशिक्षक करण्यात आलं होतं. यानंतर बंगळुरूच्या नॅशनल क्रिकेट ऍकेडमीमध्ये महिला टीमच्या कॅम्पचं आयोजन करण्यात आलं होतं. तिकडे रमेश पोवार टीमसोबत होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रशिक्षकपदासाठी ६ जणांची शेवटची यादी बनवण्यात आली होती. पण क्रिकेट सल्लागार समितीनं या ६ जणांपैकी पोवारच्या नावाला पसंती दिली. रमेश पोवार हा भारतीय महिला टीमचा मागच्या दीड वर्षातला तिसरा प्रशिक्षक आहे. याआधी तुषार अरोठे आणि त्याआधी पुर्णिमा राव भारतीय महिला टीमचे प्रशिक्षक होते. २०१७ सालच्या वर्ल्ड कपआधी पुर्णिमा राव यांची हकालपट्टी करण्यात आली होती. तर ज्येष्ठ क्रिकेटपटूंच्या नाराजीमुळे तुषार अरोठे यांनाही राजीनामा द्यावा लागला होता.


रमेश पोवार प्रशिक्षक झाल्यानंतर भारतीय महिला टीम आता श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. ९ नोव्हेंबरपासून वेस्ट इंडिजमध्ये टी-२० वर्ल्ड कप खेळवण्यात येणार आहे. यामध्ये भारताचा सामना न्यूझीलंड, पाकिस्तान, ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.