मुंबई : भारतीय महिला संघाची माजी कर्णधार मिताली राज आणि प्रशिक्षक रमेश पोवार यांच्यातील वाद हा शमण्याऐवजी आणखी चिघळत चाललाय. मितालीला सांभाळणं अतिशय कठीण असल्याचा पलटवार प्रशिक्षक रमेश पोवार यांनी केला. तर या आरोपांमुळे भारतासाठी एवढी वर्ष खेळल्याचं वाया गेल्याचं मितालीनं म्हटलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हरमनप्रीत कौर विरुद्ध मिताली राज या आजी-माजी कर्णधारांमधील हा वाद साधा दोन क्रिकेटपटूंमधला वाटत होता. मात्र, मितालीनं प्रशिक्षक रमेश पोवार आणि प्रशासकीय समिती डायना एडुलजींवर थेट पक्षपातीपणाचा आरोप केल्यानं भारतीय महिला क्रिकेट चांगलचं ढवळून निघालंय. मितालीनं राहुल जोहरींची भेट घेतल्यानंतर प्रशिक्षक रमेश पोवार यांनी मितालीबरोबर झालेल्या वादाला दुजोरा दिला. तसंच तिला सांभाळणं अतिशय कठीण असल्याचं स्पष्टीकरण दिलंय.


टी-२० विश्वचषकातील इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यातून मिताली राजला संघातून डावलणं हा सांघिक निर्णय होता. स्ट्राईक रेट कमी असल्यानं तिला संघात स्थान देण्यात आलं नव्हतं. तिच्याबरोबर आपले तणावपूर्ण संबंध आहेत. तसंच तिला आवरणं शक्य होतं नाही, असे आरोप रमेश पोवार यांनी केले.


रमेश पोवार यांनी बीसीसीआयला दिलेल्या रिपोर्टमध्ये मिताली राजवर ब्लॅकमेलिंगचा आरोप केला आहे. मला ओपनिंग करायची संधी मिळाली नाही तर महिला वर्ल्ड टी-२० मधून नाव परत घेऊन संन्यास घेईन अशी धमकी दिल्याचं रमेश पोवार यांनी या रिपोर्टमध्ये सांगितलं. मिताली राजनं प्रशिक्षकांना ब्लॅकमेल करणं आणि त्यांच्यावर दबाव टाकणं बंद केलं पाहिजे. मितालीनं स्वत:पेक्षा टीमचं हित पाहिलं पाहिजे, असं रमेश पोवार या रिपोर्टमध्ये म्हणाले. 


प्रशिक्षक रमेश पोवार यांनी केलेल्या आरोपांनंतर मिताली राजनं सोशल मीडियाच्या माध्यमातून पुन्हा आपलं रोखठोक मत व्यक्त केलं. माझ्या आयुष्यातील हा काळा दिवस आहे. या आरोपांमुळे मला दु:ख झालंय.माझ्या देशभक्तीवरच प्रश्नचिन्ह उभं कऱण्यातं आलं.  २० वर्ष भारतीय संघाकडून मी खेळले. मात्र, माझी मेहनत वाया गेली, असं ट्विट मिताली राजनं केलंय.


मिताली राजनं बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी आणि महाप्रबंधक सबा करीम यांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये गंभीर आरोप केले आहेत. वेस्ट इंडिजमध्ये खेळवण्यात आलेल्या वर्ल्ड टी-२० दरम्यान रमेश पोवार यांनी आपल्याला अपमानित केलं होतं. टीममधून बाहेर काढल्यामुळे मला रडू आलं होतं, असं या ई-मेलमध्ये मिताली म्हणाली होती. सोमवारी मिताली राजनं बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांची भेटही घेतली होती.