रणजी ट्रॉफी सामना खेळण्यासाठी मैदानात आले बिहारचे 2 संघ; गोंधळात फुटलं अधिकाऱ्याचे डोकं
Ranji Trophy Match 2024 : रणजी ट्रॉफी 2024 च्या मोसमातील पहिल्याच सामन्यात बिहार क्रिकेटमध्ये गोंधळ उडाला होता. मुंबईचा संघ बिहारची राजधानी पाटणा येथे पोहोचला आहे. दोन्ही संघांमधील सामना सुरू होण्याआधीच असे काही घडले ज्यामुळे बिहार क्रिकेटमध्ये मोठा वाद झाला.
Bihar vs Mumbai Ranji Trophy Match 2024 : बिहारच्या पाटणा येथील मोइनुल स्टेडियममध्ये रणजी ट्रॉफी सामना खेळवला जात आहे. मुंबई आणि बिहार यांच्यातील क्रिकेट सामना पाहण्यासाठी पहिल्याच दिवशी स्टेडियममध्ये लोकांनी गर्दी केली होती. मात्र रणजी ट्रॉफी 2023-24 चा पहिला दिवस बिहार संघासाठी आश्चर्यकारक घटनांनी भरलेला होता. मुंबईविरुद्धचा हा सामना खेळण्यासाठी बिहारचे एक नाही तर दोन संघ मैदानात उतरले होते. या घटनेनंतर मोईनुल हक स्टेडियमचे अनेक फोटो आणि व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दरम्यान मैदानातला वाद इतका वाढला की प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले आणि एका अधिकाऱ्याचे डोकं फुटलं.
या सामन्यामुळे बिहार क्रिकेट असोसिएशनमधील वाद समोर आला आहे. 5 जानेवारीपासून सुरू झालेला हा सामना मुंबईविरुद्ध खेळण्यासाठी बिहारचे दोन संघ मैदानावर पोहोचले होते. त्यानंतर बिहार क्रिकेट असोसिएशनच्या (बीसीए) दोन गटांमध्ये हाणामारी देखील झाली. खेळाच्या सुरुवातीला तर अधिकाऱ्यांमध्ये जोरदार बाचाबाची आणि किरकोळ हाणामारी झाली. प्रकरण इतके वाढले की पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. मात्र, पोलीस आल्याने प्रकरण मिटले आणि दुपारी एकच्या सुमारास बिहार-मुंबई सामना सुरू झाला.
मुंबईविरुद्धचा सामना खेळण्यासाठी बिहारकडून सकाळीच मैदानावर दोन संघ पोहोचले होते. त्या दोन संघांपैकी एक संघ बीसीएचे अध्यक्ष राकेश तिवारी यांनी निवडला होता. तर दुसरा संघ सचिव अमित कुमार यांचा होता. आश्चर्याची बाब म्हणजे या दोन्ही संघात एकही क्रिकेटपटू असा नव्हता ज्याचे नाव दोन्ही संघात होते. त्यामुळे राकेश तिवारी आणि अमित कुमार यांनी वेगवेगळे खेळाडू निवडले होते. सामन्याआधीच एक संघ अध्यक्ष राकेश तिवारी यांनी जाहीर केला होता. तर दुसरीकडे बरखास्त केलेले सचिव अमित कुमार यांनी दुसऱ्या संघाची यादी जाहीर केली होती.
या सगळ्या प्रकारानंतर कोणता संघ मुंबईसमोर खेळणार यावरून बीसीएमध्ये वाद सुरू झाला. सकाळी बीसीएचे दोन्ही संघ स्टेडियमबाहेर पोहोचले होते. मात्र, पोलीस दलाने अमित कुमार संघाला यांच्या संघाला बसमध्ये बसवून बाहेर पाठवले. यानंतर बीसीएचे अध्यक्ष राकेश तिवारी यांनी जारी केलेल्या यादीतील खेळाडूंनी सामन्यात भाग घेतला. मात्र काही वेळानंतर अज्ञातांनी बीसीएचे ओएसडी मनोज कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. कोणीतरी त्यांच्या डोक्यात दगड मारला होता. या घटनेनंतर बीसीएने अशी घटना पुन्हा घडू नये म्हणून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट केलं.