क्रिकेट समीक्षक रवि पत्की मुंबई: रोहितने वन डे सामन्यात 200 केल्यावर मैदानावर टीव्ही प्रक्षेपणाचे काम करणाऱ्या एका क्रू मेंबरने त्याचे नाव WWF कुस्तीचे फड गाजवणाऱ्या ब्रेट हार्ट च्या टोपण नावावरून 'हिट मॅन' असं ठेवलं. कलाक्षेत्रात असल्या अरसिक औरंगजेबा  सारखे उदाहरण शोधून सापडणार नाही. रोहित सारख्या बारीक कलाकुसर करणाऱ्याला कुस्तीविराचे नाव? हे म्हणजे राजा रवि वर्माला त्याच्या हातातला पेंटिंग ब्रश काढून घेऊन इमारतीच्या बांधकामावरचे कुदळ आणि फावडे हातात देऊन उभे केल्यासारखे झाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहितच्या नजाकतीने प्राजक्ताचा सडा पडतो, लफ्फेद्दार हिरव्यागार श्रावणपात्यातून हरणे पळत जातात, निळ्या शुभ्र अवकाशात गरुड भरारी घेतो. थोडक्यात रोहितच्या चौकार षटकारांनी कधीही भूकंप होत नाही तर बोरकरांच्या कवितेप्रमाणे प्रेयसीच्या पापण्यांच्या हालचालीने त्रिभुवन डळमळते तसे होते. 


कालच्या रोहितचा 127 हा नेहमीच्या नजाकतीला डेड डिफेन्सची जोड देणारा संयम होता. तंत्र होते, पिचचा अभ्यास होता. 34 वर्षात माझ्यासारखा असामान्य गुणवत्तेचा माणूस फक्त 40 च्या आसपासच कसोटी कसा खेळू शकतो ह्याचे खोल रुतलले शल्य होते. प्रथमश्रेणीत 24 शंभर त्यात एक त्रिशतक देखील, ODI मध्ये 29 शतकं त्यात द्विशतके देखील असे असताना, इतका मोठ्या शतकांचा रतीब असताना कसोटीत काय चुकत होतं हे रोहितने शोधून काढलं. 


ज्या वयात कमीतकमी 100 कसोटी नावावर हव्या होत्या त्या वयात आपल्याला त्याच्याकडून फक्त 40 कसोटीची मेजवानी मिळाली.मुख्य तंत्रात केलेला अमुलाग्र बदल,शरीराच्या दूर चेंडू असेल तर खेळायचा नाही म्हणजे नाही हा निग्रह, डोक्याखाली चेंडूशी बॅटचा केलेला संपर्क,आठवण ठेऊन केलेलं योग्य शॉट सीलेक्शन. कसोटीत वयात आलेल्या रोहितचे खूप खूप अभिनंदन.


राहुल आणि रोहितने मस्त पायाभरणी केलीये.पुजाराने सुरवातीपासूनच पुजारा style ला फाटा देऊन धावा जमवून मोक्याच्या क्षणी भारताला सुस्थित नेले. ह्या सिरीजमध्ये रोहित पुजारासारखा खेळतोय आणि पुजारा रोहितसारखा. लॅटरल मूव्हमेंट न मिळणाऱ्या पिचवर सिरीजमध्ये पहिल्यांदाच मिडॉन, मिडॉफ ला बॅटिंग बघायला मिळाली.


ओव्हलची खेळपट्टी सहज विकेट्स मिळवून देत नाहीये. त्यामुळे भारताला मोठं टार्गेट सेट केले पाहिजे.इंग्लंड हवामानाने दगा दिला नाही तर इंग्लंडला चांगलं टार्गेट चेस करायला लावण्यात भारताला यश येईल अशी आशा करू.एकंदर सामना रंगतदार स्थितीत आहे. भारताने चांगली बॅटिंग करून तो रंगतदार स्थतीत आणला आहे.