मुंबई : भरत अरुण याची टीम इंडियाच्या बॉलिंग कोच म्हणून नियुक्ती झाली आहे. भरत अरुण बरोबरच संजय बांगर याची टीम इंडियाचा सहाय्यक कोच आणि एस.श्रीधर हे टीम इंडियाचे फिल्डिंग कोच असतील. बीसीसीआयनं पत्रकार परिषदेमध्ये या नावांची घोषणा केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भरत अरुण यांच्या नियुक्तीमुळे झहीर खान याची भूमिका नेमकी काय असणार याबाबत प्रश्न निर्माण झाले होते. यासगळ्या प्रश्नांना मुख्य कोच रवी शास्त्रीनं उत्तर दिलं आहे. झहीर खान आणि राहुल द्रविडसोबत माझे कोणतेही वाद नाहीत. माझं दोघांशी बोलणं झालं आहे.


टीमसाठी ते जे योगदान करतील त्याचं स्वागतच आहे, असं शास्त्री म्हणाला आहे. झहीर आणि द्रविड हे सल्लागार असतील तसंच ते दोघं टीम इंडियाला किती दिवस सहाय्य करतील यावर सगळं अवलंबून आहे, अशी प्रतिक्रिया शास्त्रीनं दिली आहे. मला हव्या असलेल्या कोर टीमबाबत मी ठाम होतो, असं वक्तव्य शास्त्रीनं केलं आहे.


टीम इंडियाचा बॉलिंग सल्लागार म्हणून सचिन, गांगुली आणि लक्ष्मणच्या सल्लागार समितीनं झहीर खानची निवड केली होती तर परदेश दौऱ्यावेळी बॅटिंग सल्लागार म्हणून राहुल द्रविडला नियुक्त करण्यात आलं होतं. द्रविड आणि झहीरच्या निवडीवरून वाद निर्माण झाला होता.