मुंबई : भारताची अर्थव्यवस्था ही सध्या कठीण परिस्थितीमधून जात आहे. देशावर मंदीचं संकट ओढावलं आहे, पण टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांना मात्र या मंदीचा फरक पडला नाही. रवी शास्त्री यांची टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी फेरनियुक्ती झाली. यानंतर रवी शास्त्री यांचं मानधन २० टक्क्यांनी वाढवण्यात आलं आहे. यामुळे रवी शास्त्रींना वर्षाला ९.५ कोटी ते १० कोटी रुपये मिळणार आहेत, असं वृत्त मुंबई मिरर या वृत्तपत्राने दिलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधीच्या कार्यकाळात रवी शास्त्री यांना वर्षाला ८ कोटी रुपयांचं मानधन मिळत होतं. रवी शास्त्री यांच्याबरोबरच त्यांच्या सहकाऱ्यांचं मानधनही वाढवण्यात आलं आहे. बॉलिंग प्रशिक्षक भरत अरुण आणि फिल्डिंग प्रशिक्षक आर. श्रीधर यांना वर्षाला ३.५ कोटी रुपये मानधन मिळेल. संजय बांगर यांच्याऐवजी बॅटिंग प्रशिक्षक म्हणून निवड झालेले विक्रम राठोड यांना २.५ कोटी ते ३ कोटी रुपये मिळतील.


'टीममध्ये विश्वास असल्यामुळेच मी पुन्हा या पदावर आलो आहे. पुढच्या २ वर्षांमध्ये होणारं संक्रमण व्यवस्थित करणं गरजेचं आहे. २ वर्षांमध्ये ३-४ फास्ट बॉलर तयार करायचे आहेत,' असं रवी शास्त्री यांनी प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर सांगितलं होतं. तसंच टीम जुन्या चुकांमधून सुधारेल, असा विश्वासही शास्त्रींनी व्यक्त केला होता. 'चुकांमधून तुम्ही शिकलं पाहिजे, कोणतीच व्यक्ती परिपूर्ण नसते,' अशी प्रतिक्रिया शास्त्रींनी दिली होती.