एंटिग्वा : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या २ टेस्ट मॅचच्या सीरिजला गुरुवार २२ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. या टेस्ट सीरिजमध्ये ऑलराऊंडर रवींद्र जडेजाला विक्रमाची संधी आहे. हा विक्रम करण्यापासून जडेजा फक्त ८ विकेट दूर आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये २०० विकेट घेण्यासाठी जडेजाला आणखी ८ विकेटची गरज आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रवींद्र जडेजाने ४१ टेस्ट मॅचमध्ये १९२ विकेट घेतल्या आहेत. या सीरिजमध्ये जडेजाने ८ विकेट घेतल्या, तर तो भारताकडून सगळ्यात जलद २०० विकेट घेणारा दुसरा बॉलर ठरेल. भारताकडून सगळ्यात जलद २०० विकेट घेण्याचा विक्रम अश्विनच्या नावावर आहे. अश्विनने ३७ टेस्ट मॅचमध्ये २०० विकेट घेतल्या. जडेजा हा सध्या बॉलरच्या टेस्ट क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर आहे.


भारत आणि वेस्ट इंडिज या सीरिजपासून त्यांच्या टेस्ट चॅम्पियनशीपला सुरुवात करतील. आयसीसी क्रमवारीत भारत हा सध्या पहिल्या क्रमांकावर आहे. ही सीरिज ०-१ने हरल्यावरही भारताचा पहिला क्रमांक धोक्यात येईल. वेस्ट इंडिजने मागच्या १७ वर्षात भारताला टेस्ट मॅचमध्ये एकदाही पराभूत केलेलं नाही. मागच्या ७१ वर्षात या दोन टीममध्ये ९६ मॅच झाल्या, यातल्या ३० मॅच वेस्ट इंडिजने आणि २० मॅच भारताने जिंकल्या. उरलेल्या ४६ मॅच ड्रॉ झाल्या.