राहुल द्रविडला संघ हाताळणं शिकवू नका; Team India च्या ‘या’ खेळाडूचा BCCI ला सल्ला
त्याला त्याचं काम करुद्या....
मुंबई : भारतीय संघात ऑलराऊंडर खेळाडू म्हणून नावारुपास आलेल्या आणि संघात सध्याच्या घडीला वरिष्ठ खेळाडू म्हणून चर्चेत असणाऱ्या रविंद्र जडेजा यानं त्याच्या अंदाजात भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी आलेल्या माजी खेळाडू राहुल द्रविड याचं स्वागत केलं आहे. (Rahul Dravid)
द्रविडला शुभेच्छा देत असताना, जडेजानं बीसीसीआयलाही टोला लगावत द्रविडला त्याच्या अंदाजात काम करुद्या असं सांगितलं. द्रविडला त्याच्या कार्यपद्धतीला वाव देऊ द्यावा. त्याच्य कामात ढवळाढवळ करु नये असं आपलं ठाम मत त्यानं मांडलं आहे.
‘तर... तुम्ही राहुल द्रविड, या इतक्या मोठ्या नावाला संघाच्या प्रशिक्षकपदी आणता तर त्यांच्या दूरदृष्टीवर लक्ष केंद्रीत करा. माझी नियामक मंडळाला विनंती आहे की राहुल द्रविडच्या दृष्टीक्षेपासोबत पुढे चला. त्याचा समजनतदारपणा, समर्पकता केंद्रस्थानी राहूद्या. त्याला काय करावं, संघ कसा चालवायचा हे ठरवू नका’, असं रविंद्र एका पोर्टलशी संवाद साधताना म्हणाला.
BCCI चं संघाच्या प्रशिक्षकांशी असणारं समीकरण जाणत असल्याचं जडेजाच्या या वक्तव्यावरुन स्पष्ट झालं.
‘शिस्तबद्धतेचा आदर्श जेव्हा समोर येतो त्यावेळी राहुल द्रविडचं नाव पुढे येतं. संघाच्या प्रशिक्षकांकडून तुमच्या फार अपेक्षा असतात. पण, त्यातही शिस्त आणि समर्पकता या दोन मुख्य गोष्टी असतात. या सर्व परिस्थितीमध्ये पुढे टी20 संघाच्या कर्णधारपदावरील खेळाडूची निवड कोण करतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. राहुल द्रविड की निवड समिती...?’, असं जडेजा म्हणाला.
जडेजानं बीसीसीआयची घेतलेली कानपिळी आता कोणत्या निकाली निघते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर न्यूझीलंडच्या दौऱ्यादरम्यान राहुल द्रविड त्याचा कार्यभार सांभाळणार आहे.
पुढच्या किमान 2 वर्षांसाठी तो संघाचा प्रशिक्षक असेल. आपल्यासाठी ही अत्यंत सन्मानजनक बाब असल्याचं राहुल द्रविड म्हणाला. ‘द वॉल’ म्हणून क्रिकेटच्या विश्वात नावाजलेल्या या खेळाडूला मिळालेली ही जबाबदारी पाहता संघात यामुळं आता कोणते बदल पाहायला मिळतात हे जाणून घेणं औत्सुक्याचं असेल.