रवींद्र जडेजा अडचणीत, रेस्टॉरंटवर आरोग्य विभागाचा छापा
टीम इंडियाचा सदस्य असलेला मात्र, सध्या टीममध्ये समावेश नसलेला रवींद्र जडेजा अडचणीत सापडला आहे. मात्र, यावेळी त्याच्या अडचणीचं कारण त्याचं रेस्टॉरंट आहे.
नवी दिल्ली : टीम इंडियाचा सदस्य असलेला मात्र, सध्या टीममध्ये समावेश नसलेला रवींद्र जडेजा अडचणीत सापडला आहे. मात्र, यावेळी त्याच्या अडचणीचं कारण त्याचं रेस्टॉरंट आहे.
रवींद्र जडेजाचं शहर असलेल्या राजकोटमध्ये आरोग्य विभाग गेल्या अनेक दिवसांपासून हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये छापे टाकत आहे. छापे टाकून खाद्यपदार्थांची क्वॉलिटी चेक करण्यात येत आहे.
त्याचप्रमाणे शुक्रवारी रवींद्र जडेजाच्या रेस्टॉरंटवर आरोग्य विभागाकडून छापा टाकण्यात आला. या छाप्यात आरोग्य विभागाला शिळ्या भाज्या आढळल्या. तसेच फ्रिजमध्ये मंच्युरियन, न्यूडल्स आणि पास्ता ठेवल्याचं आढळलं.
हे रेस्टॉरंट रवींद्र जडेजाची बहिण चालवते. छापा टाकल्यानंतर आढळलेल्या शिळ्या भाज्या आरोग्य विभागाकडून नष्ट करुन देण्यात आल्या. तसेच आरोग्य विभागाने जडेजाच्या रेस्टॉरंटच्या नावावर नोटीस पाठवली आहे.
रवींद्र जडेजाचं हे रेस्टॉरंट राजकोटमध्ये जड्डूस फुड्स फिल्ड रेस्टॉरंट नावाने चालवलं जातं. ही छापेमारी म्हणजे आरोग्य विभागातर्फे नियमित करण्यात येणाऱ्या तपासणीचा एक भाग असल्याचं म्हटलं आहे. या रेस्टॉरंटच्या बाजुला असलेल्या आंतरराष्ट्रीय फूड कोर्ट चेन मॅकडोनाल्डवरही छापा टाकण्यात आला.
रवींद्र जडेजाचं जड्डूस फुड्स हे रेस्टॉरंट खूपच प्रसिद्ध आहे. हे रेस्टॉरंट गेल्या वर्षी डिसेंबरमध्येही चर्चेत आलं होतं. त्यावेळी महानगरपालिकेच्या टीमने अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी कारवाई केली होती.
शिळं खाद्य, अनेक तासांपूर्वी बनवलेलं खाद्य, न्यूडल्स, पास्ता, उकडलेले बटाटे, शिळे बेकरीतील पदार्थ, शिळ्या भाज्या आरोग्य विभागाने रेस्टॉरंटमधून जप्त केल्या. त्यानंतर त्या नष्ट करण्यात आल्या.