RCB Captaincy To Rohit Sharma: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून म्हणजेच बीसीसीआयकडून इंडियन प्रिमिअर लीगच्या मेगा ऑक्शनआधी नव्या नियमाची घोषणा केली जाण्याची शक्यात आहे. रिटेन्शन स्लॅबसंदर्भातील नियमाबरोबरच राईट-टू-मॅच म्हणजेच आरटीएमच्या नियमामध्ये काही विशेष बदल असतील अशी शक्यता आहे. मात्र या बदलांचा फटका मुंबई इंडियन्सला बसू शकतो अशी शक्यता आहे. मुंबई इंडियन्सला खेळाडू रिटेन करताना माजी कर्णधार रोहित शर्माचं नेमकं काय करायचं हा प्रश्न पडलेला असेल यात शंका नाही. मुंबई रोहितला रिटेन करणार का? मुळात रोहितलाही मुंबई इंडियन्सबरोबर खेळण्यात रस आहे का? हे प्रश्नही महत्त्वाचे आहेत. 


रोहितला मुंबईकडून ऑफरची शक्यता कमीच


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित शर्माच्या आयपीएलमधील भविष्याबद्दल सध्या वेगवेगळ्या शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. मागील पर्वाच्या आधी तडकाफडकी रोहित शर्माला कर्णधारपदावरुन बाजूला करण्यात आलं. डिसेंबर महिन्यामध्ये मुंबईच्या संघाने घेतलेला हा निर्णय चाहत्यांना आवडला नव्हता. मुंबईच्या संघाने गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याला संघात घेत त्याच्याकडे कर्णधारपद दिलं. याचाच संदर्भ देत भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने रोहित शर्मा जर आयपीएल खेळणार असेल तर त्याने कर्णधार म्हणूनच खेळलं पाहिजे असं म्हटलं आहे. मुंबई इंडियन्सकडून रोहितला पुन्हा कर्णधारपद दिलं जाण्याची शक्यता कमीच असल्याचं मानलं जात आहे. असं असेल तर रोहित शर्माने मुंबई इंडियन्सची साथ सोडावी असं कैफचं म्हणणं आहे.


रोहितने कर्णधारपद म्हणूनच खेळावं


"रोहितने केवळ कर्णधार म्हणून आयपीएलमध्ये खेळावं. तो फार मोठा खेळाडू आहे. त्याने भारताने नुकत्याच जिंकलेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताचं नेतृत्व केलं आहे. त्याला नक्कीच उत्तम ऑफर्स मिळतील. मला कल्पना आहे की त्याला अनेकजण वेगवेगळ्या ऑफर्ससहीत फोन करत असतील. मात्र त्याने केवळ कर्णधारपदाची जबाबदारी घ्यावी असं मला वाटतं. कोणत्याही संघाची ऑफर स्वीकारली तरी कर्णधारपदावर त्याने ठाम राहिलं पाहिजे. रोहित शर्मा अजून 2 ते 3 वर्ष सहज आयपीएल खेळू शकतो. ही उरलेली सर्व वर्ष त्याने नेतृत्वच केलं पाहिजे. तो मैदानात ज्या गोष्टी करु शकतो त्याचा विचार केला तर नेतृत्व त्याच्याकडेच हवं. कारण फार कमी लोकांकडे ही क्षमता असते," असं कैफने म्हटलं आहे.


आरसीबीने रोहित राजी करावं कारण...


रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचा संघ सोडणार असल्याची चर्चा असतानाच नोव्हेंबर महिन्यामध्ये लिलाव पार पडणार असल्याची दाट शक्यता आहे. या लिलावामध्ये लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्जचे संघ रोहित शर्मावर दमदार बोली लावतील असं मानलं जात आहे. खरं तर हे दोन्ही संघ कर्णधाराच्या शोधात आहेत. त्यामुळेच ते रोहितवर मोठी बोली लावतील अशी शक्यता आहे. सन रायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्सचे संघही कर्णधाराच्या शोधात आहेत. मात्र रोहितला कोणता संघ विकत घेऊ शकतो याबद्दल बोलताना मोहम्मद कैफने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं नाव घेतलं आहे. इतकेच नाही तर कैफने बंगळुरुच्या संघाने रोहित शर्माला त्यांच्याकडून खेळण्यासाठी राजी केलं पाहिजे असंही म्हटलंय. रोहितने 2025 च्या आयपीएलमध्ये आरसीबीचं नेतृत्व करावं यासाठी त्या संघाच्या व्यवस्थापनाने नक्कीच प्रयत्न केला पाहिजे असं म्हटलं. रोहित कर्णधार झाला तर आरसीबीला आयपीएलचा चषक जिंकता येईल असा विश्वास कैफने व्यक्त केला.


आरसीबी चषक जिंकू शकते


"आरबीसीने 100 टक्के हा चान्स घेतला पाहिजे. काहीही झालं तरी त्यांनी त्याला (रोहित शर्माला) संघाचं कर्णधारपद स्वीकारण्यासाठी राजी केलं पाहिजे. प्लेइंग इलेव्हन कशी निवडावी हे रोहितला चांगलेच ठाऊक आहे. रोहितचा आरसीबीमध्ये समावेश जाला तर त्याचा संघाला नक्कीच फायदा होईल. कदाचित त्यांचा चषकाचा दुष्काळ संपेल असं मला वाटतं," असं मत कैफने नोंदवलं.


...अन्यथा कोहलीच पर्याय


मागील तीन पर्वांपासून फाफ ड्युप्लेसिस आरसीबीचं नेतृत्व करत आहे. मात्र त्याचं वय अधिक असल्याने आरसीबी नवीन कर्णधाराच्या शोधात असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. आरसीबी कर्णधार म्हणून भारतीय खेळाडूच्या शोधात आहे. के. एल. राहुल लखनऊच्या संघासोबत राहणार नसल्याची चर्चा असून तो सुद्धा आरसीबीचा कर्णधार होण्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे आरसीबीकडून पुन्हा एकदा विराट कोहलीलाच कर्णधारपदासाठी विचारणा केली जाईल अशीही चर्चा आहे. विराटने 2021 मध्ये आरसीबीचं कर्णधारपद सोडलं होतं.