भारतीय क्रिकेटर ईशान किशन (Ishan Kishan) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या राष्ट्रीय संघापासून दूर आहेत. मात्र त्यांनी वेगवेगळ्या कारणांमुळे रणजी ट्रॉफीपासूनही अंतर ठेवलं आहे. ईशान किशन सध्या आगामी आयपीएल हंगामासाठी आपल्या तंत्र, कौशल्यावर काम करत असल्याची माहिती आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्यासह तो बडोद्यात आयपीएलसाठी कसून सराव करत आहे. तर दुसरीकडे श्रेयस अय्यर पाठीच्या दुखापतीचा सामना करत आहे. पण बीसीसीआय या दोन्ही खेळाडूंवर प्रचंड नाराज असून त्यांच्यावर मोठी कारवाई करण्याची शक्यता आहे. बीसीसीआय दोन्ही खेळाडूंची नावं 2023-24 साठीच्या करारातून वगळू शकतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रेयस अय्यर आणि ईशान किशन यांनी आगामी वर्षासाठी करारबद्ध केल्या जाणाऱ्या खेळाडूंच्या यादीतून वगळलं जाऊ शकतं. बोर्डाने वारंवार सांगूनही दोन्ही खेळाडू स्थानिक क्रिकेटपासून दूर असल्याने ही कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.


निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनी 2023-24 हंगामासाठी करारबद्ध केल्या जाणाऱ्या खेळाडूंची यादी तयार केली आहे. बीसीसीआयस लवकरच अधिकृतपणे त्यांच्या नावांची घोषणा करु शकतं. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, 'ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना यादीतून वगळलं जाऊ शकतं. बीसीसीआयने आपला आक्षेप नोंदवला असतानाही दोघं स्थानिक क्रिकेट खेळत नसल्याने ही कारवाई केली जाऊ शकते'.


सूत्राने श्रेयस अय्यर पाठीच्या दुखण्यामुळे इंग्लंडविरोधातील तिन्ही कसोटी सामन्यात खेळला नसल्याचंही सांगितलं. त्याने पाठदुखीची तक्रार केल्यानंतर पूर्वकाळजी म्हणून इंग्लंडविरोधातील कसोटी सामन्यांमधून विश्रांती देण्यात आली होती. इंग्लंडविरोधातील दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर त्याने पाठदुखीची तक्रार केली होती. 


दरम्यान सूत्राने सांगितल्यानुसार, श्रेयस अय्यरने वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी केली आहे. सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो होता. फक्त रणजी ट्रॉफी खेळला नाही म्हणून त्याला करारातून बाहेर काढणार नाही. 


2022-23 च्या करारानुसार, इशान किशनला सी श्रेणीमध्ये ठेवण्यात आले होते, तर श्रेयस अय्यर बी मध्ये होता. ते अनुक्रमे 1 कोटी आणि 3 कोटी रुपयांची कमाई करत होते.


के एल राहुलवरही बीसीसीआय नाराज


भारताचा आघाडीचा फलंदाज के एल राहुल (KL Rahul) जखमी असल्याने इंग्लंडविरोधातील तिसऱ्या कसोटी मालिकेला मुकला होता. दुखापतग्रस्त के एल राहुलच्या जागी कर्नाटकचा युवा खेळाडू देवदत्त पडिक्कलला (Devdutt Padikkal) संधी देण्यात आली होती. दरम्यान के एल राहुलने सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीचे संदेश दिल्याचा आरोप बीसीसीआयने (BCCI) केला आहे.


के एल राहुलने सोशल मीडियाच्या माध्यमातून सराव करतानाचे फोटो शेअर केल्याने तो बीसीसीआयच्या रडारवर आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दुखापतग्रस्त असतानाही केएल राहुलने चुकीचे सिग्नन दिल्याचा आरोप बोर्डातील या सूत्राने केला आहे. के एल राहुलच्या डाव्या पायाचे स्नायू दुखावले असल्याने दुसऱ्या कसोटी सामन्यातून विश्रांती देण्यात आली होती. दरम्यान तो अद्यापही दुखापतीमधून सावरला नसल्याचं समोर आलं आहे.