विराट कोहलीसंबंधी BCCI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? अजित आगरकर काढणार समजूत
T20 World Cup: आगामी टी-20 वर्ल्डकपमधून भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला वगळलं जाण्याची शक्यता आहे. जून महिन्यात वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत वर्ल्डकप खेळला जाणार आहे. दरम्यान, विराट कोहलीच्या जागा नव्या खेळाडूंना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
Virat Kohali T20 World Cup: भारतीय संघ आणि बीसीसीआय आता आगामी टी-20 वर्ल्डकपच्या दृष्टीने तयारी करत आहे. सध्या यशस्वी, सरफराज यांसारखे नवखे खेळाडू अप्रतिम कामगिरी करत असल्याने टी-20 वर्ल्डकप संघात नेमकं कोणाला स्थान दिलं जाईल याची क्रिकेटप्रेमींना उत्सुकता आहे. यादरम्यान इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेत विश्रांती घेणारा विराट कोहली टी-20 वर्ल्डकपसाठी उपलब्ध असेल की नाही याबद्दलही साशंकता आहे. पण 'टेलिग्राफ'ने दिलेल्या वृत्तानुसार निवडकर्तेच विराट कोहलीला संघात घेण्यास उत्सुक नाहीत. विराट कोहली टी-20 मध्ये अपेक्षित कामगिरी करु शकला नसल्याने तसंच संघाच्या गरजा पूर्ण करण्यात असमर्थ ठरत असल्याने संघ व्यवस्थापन हा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
विराट कोहली 2022 टी-20 वर्ल्डकपपासून एकदाही टी-20 सामना खेळलेला नाही. पण अफगाणिस्तानविरोधातील टी-20 मालिकेसाठी रोहित शर्मासह त्याला संघात घेण्यात आलं होतं. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी टी-20 वर्ल्डकपमध्ये रोहित शर्माच भारतीय संघाचा कर्णधार असेल हे स्पष्ट केलं आहे. पण विराट कोहलीबद्दल मात्र त्यांनी मौनच बाळगलं आहे.
रिपोर्टनुसार, विराट कोहलीचा वर्ल्डकप टी-20 संघात समावेश करायचा की नाही याचा निर्णय मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्यावर सोपवण्यात आला आहे. हा फारच संवेदनशील विषय असल्याने अनेकजण या प्रक्रियेत सामील होऊ इच्छित नाही आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अजित आगरकर यांनी विराट कोहलीशी टी-20 क्रिकेटमध्ये हव्या असणाऱ्या बदलासंबंधी चर्चा केली. पण अफगाणिस्तानविरोधातील मालिकेत विराटला फारसं यश मिळालं नाही.
वेस्ट इंडिजमधील स्थिती विराट कोहलीच्या खेळीला साजिशी नाही असं संघ व्यवस्थापनाला वाटत आहे. यामुळे विराट कोहलीला नवख्या खेळाडूंसाठी जागा करण्याची मनवण्याची जबाबदारी अजित आगरकर यांच्याकडे देण्यात आली आहे. सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, रिंकू सिंग आणि शिवम दुबे यांच्यासह अनेक खेळाडू विराटच्या तुलनेत टी-20 मध्ये चांगली कामगिरी करतील असं बीसीसीआयला वाटत आहे.
दरम्यान टी-20 वर्ल्डकपमध्ये के एल राहुलला संधी दिली जाऊ शकते. पण त्याची दुखापत अद्यापही चिंतेचा विषय आहे. दुसरीकडे ध्रुव जुरेल आणि जितेश शर्मा यांनी आपल्या कामगिरीने छाप पाडली आहे. दरम्यान आयपीएलमध्ये भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवर बीसीसीआयचं लक्ष असेल. आयपीएल त्यांच्यासाठी संघाचे दरवाजे उघडू शकतात.
भारतीय संघ अ गटात असून, पाकिस्तान, अमेरिका आणि कॅनडा या संघांचा सामना करणार आहेत. पहिला सामना 5 जूनला कॅनडाविरोधात असणार आहे. 9 जूनला भारत आणि पाकिस्तान भिडणार आहेत. 2013 पासून भारताने एकही आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही.