प्रथम श्रेणीत रन्सचा पाऊस पाडणाऱ्या रिषभ पंतला धोनीऐवजी संधी
श्रीलंका आणि बांग्लादेशविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी विराट कोहली आणि धोनी या दिग्गज खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.
मुंबई : श्रीलंका आणि बांग्लादेशविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी विराट कोहली आणि धोनी या दिग्गज खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. ६ मार्चपासून सुरु होणाऱ्या या ट्रायसीरिजसाठी टीमची घोषणा करण्यात आली आहे. या टीममधून सध्याच्या ६ दिग्गजांना आराम देण्यात आला आहे. या दौऱ्यामध्ये धोनीच्याऐवजी रिषभ पंतला संधी देण्यात आली आहे.
रोहित शर्मा या टीमचं नेतृत्व करणार आहे. रिषभ पंत या दौऱ्यामध्ये विकेट कीपिंग करेल. सैयद मुश्ताक अली टी-20 आणि आयपीएलमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची या दौऱ्यात निवड करण्यात आली आहे. सैयद मुश्ताक अली ट्रॉफी आणि रणजी क्रिकेटमध्ये शानदार प्रदर्शन केल्यामुळे रिषभ पंतला भारतीय संघात स्थान मिळालं आहे.
याआधी रिषभ पंतला मागच्या वर्षी फेब्रुवारी २०१७ साली इंग्लंडविरुद्ध झालेल्या टी-20 सीरिजमध्ये निवडण्यात आलं होतं. पंतनं शेवटची टी-20 मॅच वेस्ट इंडिजविरुद्ध जुलै २०१७ साली खेळली होती. भारताकडून खेळलेल्या २ टी-20मध्ये पंतनं ४३ रन्स केल्या आहेत.
पंतनं ३२ बॉल्समध्ये केलं होतं शतक
मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीमध्ये रिषभ पंतनं जानेवारी २०१८मध्ये वादळी शतक झळकावलं होतं. या मॅचमध्ये पंतनं ३२ बॉल्समध्ये शतक केलं होतं. क्रिस गेलनंतर हे टी-20 क्रिकेटमधलं सगळ्यात जलद शतक आहे. या यादीमध्ये पंतनं रोहित शर्मालाही मागे टाकलं.
टी-20 क्रिकेटमधली वेगवान शतकं
क्रिस गेल- ३० बॉल्समध्ये शतक- २०१३
रिषभ पंत- ३२ बॉल्समध्ये शतक- २०१८
ऍन्ड्रयू सायमंड्स ३४ बॉल्समध्ये शतक- २००४
एलपी वेन- ३५ बॉल्समध्ये शतक- २०११
डेव्हिड मिलर- ३५ बॉल्समध्ये शतक- २०१७
रोहित शर्मा- ३५ बॉल्समध्ये शतक- २०१७