आयसीसी क्रमवारीत विराट टॉपवर कायम, ऋषभ सर्वोत्तम क्रमांकावर
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता.
दुबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवानंतरही भारतीय टीमच्या क्रमवारीमध्ये फारसा फरक पडलेला नाही. भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहली बॅट्समनच्या यादीत पहिल्या क्रमांकावर कायम आहे. तर विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंत आणि फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह त्यांच्या आत्तापर्यंतच्या सर्वोत्तम क्रमवारीवर पोहोचले आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलियातली चार टेस्ट मॅचची सीरिज १-१नं बरोबरीत आहे. या दोन्ही टीममधली तिसरी टेस्ट २६ डिसेंबरपासून सुरु होईल.
विराट कोहलीनं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पर्थमध्ये झालेल्या दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये १२३ रनची खेळी केली. या खेळीमुळे विराटच्या खात्यात १४ अंक जमा झाले. आता टेस्ट क्रिकेटमध्ये विराटच्या नावावर ९३४ अंक आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या टेस्टमध्ये केन विलियमसननं ९१ रन बनवल्यामुळे त्याच्या खात्यात ९१५ अंक आहेत. ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ ८९२ अंकासोबत तिसऱ्या क्रमांकावर आणि चेतेश्वर पुजारा ८१६ अंकासह चौथ्या क्रमांकावर आहे.
टॉम लेथमचीही सर्वोत्कृष्ट कामगिरी
श्रीलंकेविरुद्धच्या टेस्टमध्ये न्यूझीलंडच्या टॉम लेथमनं २६४ रनची खेळी केली. या खेळीमुळे टॉम लेथम १५ क्रमवारीवर २२व्या क्रमांकावर आला आहे. टॉम लेथमची ही सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. ऑस्ट्रेलियाचा उस्मान ख्वाजा १३व्या क्रमांकावरून १२व्या क्रमांकावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनला ९ क्रमवारीचा फायदा झाल्यामुळे तो ४६व्या क्रमांकावर पोहोचला आहे.
बुमराहला ५ स्थानांचा फायदा
भारताचे फास्ट बॉलर मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांनाही त्यांच्या चांगल्या कामगिरीचा फायदा झाला आहे. मोहम्मद शमी २३व्या क्रमांकावरून २१व्या क्रमांकावर पोहोचला आहे. जसप्रीत बुमराहला ५ स्थानांचा फायदा झाल्यामुळे तो २८व्या क्रमांकावर आहे. पर्थ टेस्टमध्ये मॅन ऑफ द मॅच असणारा नॅथन लायन त्याचा कारकिर्दीतली सर्वोत्तम क्रमवारी सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिकेचा कगिसो रबाडा पहिल्या क्रमांकावर कायम आहे. रवींद्र जडेजा पाचव्या आणि आर.अश्विन सहाव्या क्रमांकावर आहेत.