विकेटकीपर फलंदाज म्हणून करिअर का निवडलं? ऋषभ पंतने सांगितलं कारण
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी 20 मालिका 9 जूनपासून सुरु होणार आहे. विकेटकीपर फलंदाज असलेल्या ऋषभ पंत याची संघात निवड झाली आहे.
मुंबई: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी 20 मालिका 9 जूनपासून सुरु होणार आहे. विकेटकीपर फलंदाज असलेल्या ऋषभ पंत याची संघात निवड झाली आहे. यावेळी ऋषभ पंतने बायो बबलच्या निर्णयावर आनंद व्यक्त केला आहे. या मालिकेत खेळाडूंना विना बायो बबल खेळण्यास परवानगी दिली आहे. 2020 मध्ये कोरोनाचा फैलाव होत असल्याने खेळाडूंसाठी नियमावली आखण्यात आली होती. मात्र यामुळे खेळाडूंच्या मानसिकतेवर परिणाम होत होता, असंही ऋषभ पंतने सांगितलं. त्याचबरोबर आपण विकेटकीपर फलंदाज का झालो? यामागचं कारणही सांगितलं.
“जेव्हा मी मैदानावर येतो तेव्हा मी नेहमीच माझे शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करतो. मी यष्टीरक्षक-फलंदाज आहे, कारण मी लहानपणापासूनच कीपिंग करायला सुरुवात केली होती. कारण माझे वडील देखील विकेटकीपर होते. मग मीही विकेटकीपिंगला सुरुवात केली.", असं ऋषभ पंतने सांगितलं.
ऋषभ पंतने सांगितले की, “बायो-बबलमधून बाहेर पडणे खरोखरच खूप चांगलं आहे आणि आशा आहे की यापुढे बायो-बबलसारखी परिस्थिती राहणार नाही. मला हा निर्णय ऐकून खूप आनंद झाला. जेव्हा तुम्ही वर्षभर खेळता, विशेषत: दबावात तुमच्या मनाला विश्रांती देणे महत्त्वाचे असते. जर तुम्ही तणाव दूर करू शकत नसाल तर तुम्ही शंभर टक्के देऊ शकत नाही. यासाठी तणावमुक्त राहणं गरजेचं असतं.”
महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर विकेटकीपर फलंदाज म्हणून ऋषभ पंतकडे पाहिलं जातं. 24 वर्षीय ऋषभ पंतनं आतापर्यंत 30 कसोटी, 24 एकदिवसीय आणि 43 टी 20 सामने खेळले आहेत. काही माजी खेळाडूंनी भारताचं नेतृत्व करण्याचे सर्व गुण ऋषभ पंतमध्ये असल्याचं देखील सांगितलं आहे.
दक्षिण अफ्रिका विरुद्धच्या टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया
केएल राहुल (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, वेंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंह आणि उमरान मलिक.