नॉटिंगहम : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा शानदार विजय झाला. ५ टेस्ट मॅचच्या सीरिजच्या पहिल्या दोन मॅच गमावल्यानंतर भारतानं जोरदार पुनरागमन केलं. या मॅचमधून ऋषभ पंतनं टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. पहिल्याच मॅचमध्ये ७ कॅच पकडण्याचं रेकॉर्डही ऋषभ पंतनं त्याच्या नावावर केलं. तसंच पंतनं बॅटिंग करताना टेस्ट क्रिकेटमधील पहिली रन सिक्स मारून केली. पंत टेस्ट इतिहासात सिक्स मारुन कारकिर्दीची सुरुवात करणारा १२ वा खेळाडू आणि पहिला भारतीय ठरला. या मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये पंतनं २४ रन केल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंडमध्ये विकेट कीपिंग नेहमीच कठीण असते कारण बॉल स्विंग होतो. मागच्या अडीच महिन्यांपासून मी इंग्लंडमध्ये भारत ए कडून खेळत आहे, यामुळे माझा फायदा झाल्याचं पंत म्हणाला. आयपीएल आणि घरगुती स्पर्धांमध्ये मी खेळलो आहे. पण देशासाठी खेळण्याची भावना वेगळीच असते. टेस्ट क्रिकेट खेळणं हे माझं स्वप्न होतं, असं वक्तव्य पंतनं केलं आहे.


यशाचं श्रेय राहुल द्रविडला


रुडकीवरून दिल्लीला क्रिकेट खेळण्यासाठी आलेल्या पंतनं त्याच्या यशाचं श्रेय राहुल द्रविडला दिलं आहे. मी शून्यापासून सुरुवात केली होती. जेव्हा तुम्ही मेहनत करता तेव्हा त्याचं फळ तुम्हाला मिळतं. मी राहुल द्रविड आणि माझे लहानपणीचे प्रशिक्षक राहुल सिन्हा यांचा आभारी आहे. या दोघांनी मला नेहमी मदत केली, अशी प्रतिक्रिया पंतनं दिली आहे. राहुल द्रविड हा सध्या भारताच्या अंडर १९ टीमचा प्रशिक्षक आहे.