बंगळुरू : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-२०मध्ये रोहित शर्माला मोठी खेळी करता आली नाही. या सीरिजच्या दुसऱ्या टी-२०मध्येही रोहितने निराशा केली. बंगळुरूमध्ये झालेल्या दुसऱ्या टी-२०मध्ये भारताने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, पण रोहित तिसऱ्या ओव्हरमध्येच आऊट झाला. या मॅचसाठी मैदानात उतरताच रोहितच्या नावावर नवा विक्रम झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी-२० मॅच खेळण्याचा विक्रम रोहितच्या नावावर झाला आहे. रोहितने भारतासाठी ९८ टी-२० मॅच खेळल्या आहेत. एमएस धोनीनेही एवढ्याच मॅचमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे. रोहितने ९८ मॅचमध्ये ३२.१४ च्या सरासरीने आणि १३६.५६च्या स्ट्राईक रेटने २,४४३ रन केले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहितने ४ शतकं आणि १७ अर्धशतकं केली आहेत. एवढी शतकं करणारा रोहित हा एकमेव खेळाडू आहे. 


भारताकडून सर्वाधिक टी-२० खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सुरेश रैना तिसऱ्या क्रमांकावर आहे. रैनाने भारतासाठी ७८ मॅच खेळल्या आहेत. तर चौथ्या क्रमांकावर असलेल्या विराटने ७२ टी-२० मॅच खेळल्या आहेत. ५८ मॅच खेळलेला युवराज पाचव्या क्रमांकावर आणि ५५ मॅच खेळलेला शिखर धवन सहाव्या क्रमांकावर आहे.