रोहितनं गांगुली-लारा-जयवर्धनेचं रेकॉर्ड मोडलं, सईद अन्वरशी बरोबरी
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये भारताचा दणदणीत विजय झाला.
गुवाहाटी : वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये भारताचा दणदणीत विजय झाला. विराट कोहली आणि रोहित शर्माच्या शानदार शतकांमुळे भारतानं ही मॅच ८ विकेटनं जिंकली. विराटचं वनडे क्रिकेटमधलं हे ३६वं तर रोहितचं २०वं शतक होतं. रोहित शर्मानं ११७ बॉलमध्ये नाबाद १५२ रन तर कर्णधार विराट कोहलीनं १०७ बॉलमध्ये १४० रन केले. वनडेमध्ये सर्वाधिक शतक करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित शर्मा १२व्या क्रमांकावर जाऊन पोहोचला आहे. वनडेमध्ये सर्वाधिक शतक करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिननं वनडेमध्ये ४९ शतकं केली आहेत. तर या यादीत विराट दुसऱ्या क्रमांकावर आहे.
रोहित शर्माची ही १८९वी वनडे होती. एवढ्या मॅचमध्ये रोहितनं ४७.१६ च्या सरासरीनं ७,२१७ रन केले आहेत. २०वं शतक केल्यानंतर रोहितनं ब्रायन लारा, रॉस टेलर आणि महेला जयवर्धनेचं रेकॉर्ड मोडलं आहे. या तिघांच्या नावावर वनडेमध्ये १९-१९ शतकं होती. रॉस टेलरनं आत्तापर्यंत २०४ वनडे खेळल्या आहेत. तर लारा २९९ आणि जयवर्धने ४४८ वनडे खेळून निवृत्त झाले. याचबरोबर रोहितनं पाकिस्तानच्या सईद अन्वरच्या वनडेतल्या २० शतकांच्या रेकॉर्डशी बरोबरी केली आहे.
रोहितनं मोडलं गांगुलीचं रेकॉर्ड
रोहित शर्मानं त्याच्या या खेळीमध्ये ८ सिक्स मारले. याचबरोबर वनडेमध्ये त्यानं गांगुलीचं रेकॉर्ड मोडलं. रोहितनं १८९ मॅचमध्ये १९३ सिक्स मारले आहेत. तर गांगुलीनं ३११ मॅचमध्ये १९० सिक्स मारले होते. सचिननं ४६३ मॅचमध्ये १९५ सिक्स मारले आहेत. आता रोहितच्या निशाण्यावर सचिनचं रेकॉर्ड असेल. वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्स मारण्याचं रेकॉर्ड पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीच्या नावावर आहे. आफ्रिदीनं वनडे क्रिकेटमध्ये ३५१ सिक्स मारले आहेत. भारताकडून महेंद्रसिंग धोनीनं सर्वाधिक २१७ सिक्स मारले आहेत.
रोहितनं सलीम मलीक-ऍस्टललाही मागे टाकलं
रोहित शर्मानं २०व्या शतकाबरोबरच वनडे क्रिकेटमध्ये ७,२१७ रन केले आहेत. याचबरोबर त्यानं पाकिस्तानचा सलीम मलीक आणि न्यूझीलंडच्या नॅथन ऍस्टललाही मागे टाकलं आहे. सलीम मलीकनं २८३ मॅचमध्ये ७१७० रन आणि ऍस्टलनं २२३ मॅचमध्ये ७०९० रन केले.