मुंबई : केदार जाधवचं भारतीय टीममध्ये पुनरागमन झालं आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी केदारची टीम इंडियामध्ये निवड झाली आहे. केदार जाधव हा वर्ल्ड कपसाठीच्या भारतीय टीममध्ये होता, पण वर्ल्ड कपमध्ये त्याची बॅट चालली नाही. आता वेस्ट इंडिजविरुद्ध त्याला स्वत:ला सिद्ध करण्याची संधी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विजय हजारे ट्रॉफी आणि सय्यद मुश्ताक अली टी-२० ट्रॉफीनंतर आता रणजी ट्रॉफीला सुरुवात होणार आहे. ९ डिसेंबरपासून रणजी ट्रॉफीची पहिली मॅच खेळवली जाणार आहे. रणजी ट्रॉफीमध्ये केदार जाधव महाराष्ट्राकडून खेळणार आहे.


रणजी ट्रॉफी स्पर्धेसाठी केदार जाधवने सरावालाही सुरुवात केली आहे. सराव करतानाचा एक फोटो केदारने इन्स्टाग्रामवर शेयर केला आहे. 'मैदानावर येणं चांगलं वाटतं. जे मला करायचं आहे, ते मी पसंद करतो,' असं केदार त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हणाला आहे. या फोटोमध्ये केदार चष्मा लावून हातात बॅट घेऊन दिसत आहे.



रोहित शर्माने केदार जाधवच्या या फोटोवर निशाणा साधला आहे. 'पोज कम मार, बॅटिंग कर ले थोडा', अशी कमेंट रोहितने दिली आहे.



केदार जाधव या आयपीएलमध्ये पुढच्या मोसमात पुन्हा एकदा चेन्नईकडून खेळणार आहे. चेन्नईच्या टीमने त्याला रिटेन केलं आहे. मागच्या मोसमात चेन्नईकडून खेळताना केदारला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. २०१९ साली केदार टीमच्या आत-बाहेर होता. तर २०१८ सालच्या मोसमात केदार दुखापतग्रस्त झाला होता.