तेव्हा मानगूट पकडली आणि आता...; दिनेश कार्तिकसोबत असं का करतोय Rohit Sharma?
टीम इंडियाने धमाकेदार कामगिरी करताना 6 विकेट्स राखून विजय मिळवला.
मुंबई : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर खेळल्या जाणाऱ्या तीन टी-20 सामन्यांच्या सिरीजमध्ये 1-1 अशी बरोबरी साधली आहे. या मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी नागपुरात खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने धमाकेदार कामगिरी करताना 6 विकेट्स राखून विजय मिळवला.
सामना जिंकण्यासोबतच मैदानावर एक मजेशीर क्षणही पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने गंमतीशीरपणे यष्टिरक्षक दिनेश कार्तिकची मान पकडली होती. तर कालच्या म्हणजेच दुसऱ्या सामन्यात रोहितने याच कार्तिकला मिठी मारली.
सामन्याच्या शेवटच्या ओव्हरमध्ये टीम इंडियाला विजयासाठी 9 रन्सची गरज होती. त्यानंतर सर्वोत्कृष्ट फिनिशरचा पुरस्कार मिळालेला दिनेश कार्तिक स्ट्राईकवर उपस्थित होता. तो शेवटच्या ओव्हरमध्ये क्रिजवर आला. शेवटची ओव्हर वेगवान गोलंदाज डॅनियल सेम्सने टाकली. यामध्ये कार्तिकने पहिल्याच चेंडूवर लेग साइडला सिक्स ठोकला.
त्यानंतर जेव्हा 5 चेंडूत 3 रन्सची गरज होती, तेव्हा ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर कार्तिकने डीप मिड-विकेटच्या दिशेने चौकार मारून टीम इंडियाला सामना जिंकून दिला. यावेळी कर्णधार रोहित शर्मा नॉन स्ट्राईकवर उभा होता. कार्तिकची ही फिनिशर स्टाईल पाहून रोहित भारावला. यावेळी त्याने जवळ येऊन कार्तिकला मिठी मारली. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
टीम इंडियाचा विजय
पावसामुळे व्यत्यय आलेला हा नागपूर सामना 8-8 ओव्हरचा होता. टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन टीमने आठ ओव्हर्समध्ये ५ विकेट्स गमावून 91 रन्स केले. मॅथ्यू वेडने सर्वाधिक 43 रन्सची नाबाद खेळी खेळली. भारताकडून अक्षर पटेलने सर्वाधिक दोन बळी घेतले.