`बाप` झालेल्या रोहित शर्माकडून ऋषभ पंतला बेबी सिटरची ऑफर!
नुकताच बाप झालेल्या रोहित शर्मानं भारताचा विकेट कीपर ऋषभ पंतला नवी ऑफर दिली आहे.
मुंबई : नुकताच बाप झालेल्या रोहित शर्मानं भारताचा विकेट कीपर ऋषभ पंतला नवी ऑफर दिली आहे. काहीच दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या टीमचा कर्णधार टीम पेनची पत्नी बोनी ऋषभ पंतला सर्वोत्तम बेबी सिटर म्हणाली होती. आता रोहित शर्मानं त्याची मुलगी समायरासाठी बेबी सिटर होण्याची ऑफर पंतला दिली आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो... एका चांगल्या बेबी सिटरची गरज आहे. लवकर पाहिजे. ऋषभ पंत हे काम करणार असेल तर रितीकाही खुश होईल, असं ट्विट रोहित शर्मानं केलं आहे. रितिका सजदेह आणि रोहित शर्मा यांना काहीच दिवसांपूर्वी कन्यारत्न झालं आहे. रोहित आणि रितीकानं त्यांच्या मुलीचं नाव समायरा ठेवलं आहे.
ऋषभ पंतनं रोहित शर्माच्या या ट्विटला थेट उत्तर न देता यामध्ये युझवेंद्र चहलला मध्ये आणलं. ''चहल त्याचं काम नीट करत नाही का? समायराचा बेबी सिटर होणं मला नक्कीच आवडेल. रितीका सजदेह तुला शुभेच्छा'', असं ट्विट ऋषभ पंतनं केलं होतं. रोहित शर्माची पत्नी रितीका सजदेह आणि युझवेंद्र चहल हे दोघं एकमेकांना ट्विटरवर कायमच ट्रोल करत असतात, त्यामुळे ऋषभ पंतनं युझवेंद्र चहलचं नाव घेतलं.
मेलबर्न टेस्टदरम्यान टीम पेन आणि ऋषभ पंत यांच्यामध्ये शब्दांची देवाणघेवाण झाली होती. वनडे टीममध्ये एमएस धोनीचं पुनरागमन झालं आहे. त्यामुळे तू टीमच्या बाहेर गेला आहेस. तू बेबी सिटरचं काम करु शकतोस. मी पत्नीला चित्रपट दाखवायला घेऊन जाईन तेव्हा तू माझ्या मुलांच्या बेबी सिटरचं काम करशील का? असा प्रश्न पेननं पंतला विचारला होता. टीम पेनची ही वक्तव्य स्टम्प मायक्रोफोनमध्ये कैद झाली होती.
काहीच दिवसांपूर्वी टीम पेनची पत्नी बोनी आणि ऋषभ पंत एका फोटोमध्ये दिसले होते. बोनीनं हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. बेस्ट बेबी सिटर... ऋषभ पंत... असं कॅप्शन देऊन बोनीनं हा फोटो पोस्ट केला होता. या फोटोमध्ये पंतच्या कडेवर एक मुलगा होता तर दुसरा मुलगा पेनची पत्नी बोनीच्या कडेवर होता.
ऋषभ पंतकडून टीम पेनला रिटर्न गिफ्ट!
टेस्ट क्रमवारीत पंतची झेप
नुकत्याच घोषित झालेल्या टेस्ट क्रमवारीमध्ये ऋषभ पंतनं मोठी झेप घेतली आहे. टेस्ट बॅट्समनच्या क्रमवारीमध्ये पंत २१ स्थानांची उडी मारून १७व्या क्रमांकावर पोहोचला आहे. ऋषभ पंतची ही सर्वोत्तम क्रमवारी आहे. याचबरोबर पंतनं ४५ वर्ष जुन्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. १९७३ सालच्या टेस्ट क्रमवारीमध्ये विकेट कीपर फारुक इंजिनिअर याच क्रमांकावर होते. कोणत्याही भारतीय विकेट कीपरची टेस्ट क्रिकेटमधली ही सर्वोत्तम कामगिरी आहे. एमएस धोनीलाही त्याच्या कारकिर्दीत सर्वोत्तम १९वं स्थान मिळालं होतं.
सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर झालेल्या चौथ्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये ऋषभ पंतनं १५९ रनची शानदार खेळी केली. या खेळीमुळे ऋषभ पंतनं टेस्ट क्रमवारीमध्ये एवढी मोठी झेप घेतली आहे.