मुंबई : टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच ओपनिंग केलेल्या रोहित शर्माने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दणदणीत कामगिरी केली. याचा परिणाम त्याच्या टेस्ट क्रमवारीतही झाला आहे. टेस्ट क्रमवारीमध्ये रोहित शर्माने १२ स्थान वरती १०व्या क्रमांकावर आला आहे. बॅट्समनच्या क्रमवारीत टॉप-१०मध्ये एकूण ४ भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर, चेतेश्वर पुजारा चौथ्या क्रमांकावर कायम आहेत. तर अजिंक्य रहाणे पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित शर्माने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ३ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये ४ इनिंगमध्ये १३२.२५ च्या सरासरीने ५२९ रन केले. रोहित शर्माने या सीरिजमध्ये ३ शतकंही झळकावली, ज्यामध्ये एका द्विशतकाचा समावेश होता.


बॉलरच्या क्रमवारीत जसप्रीत बुमराह चौथ्या क्रमांकावर आणि आर. अश्विन १०व्या क्रमांकावर आहे. दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये खेळू शकला नव्हता. तर अश्विनने या सीरिजमध्ये सर्वाधिक १५ विकेट घेतल्या होत्या.


टीमच्या क्रमवारीमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर कायम आहे. तर दक्षिण आफ्रिकेची टीम चौथ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंड दुसऱ्या, इंग्लंड तिसऱ्या, ऑस्ट्रेलिया पाचव्या, श्रीलंका सहाव्या, पाकिस्तान सातव्या, वेस्ट इंडिज आठव्या आणि बांगलादेश नवव्या क्रमांकावर आहेत.