हॅमिल्टन : न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२०मध्ये भारताचा सुपर ओव्हरमध्ये रोमांचक विजय झाला. सुपर ओव्हरमध्ये पहिले बॅटिंग करुन न्यूझीलंडने १७ रन केले, त्यामुळे भारताला विजयासाठी १८ रनचं आव्हान मिळालं. यानंतर भारताला विजयासाठी शेवटच्या २ बॉलमध्ये १० रनची गरज होती. रोहित शर्माने टीम साऊदीच्या शेवटच्या दोन्ही बॉलवर सिक्स मारून भारताला जिंकवून दिलं. याचसोबत भारताने ५ मॅचच्या या टी-२० सीरिजमध्ये ३-०ने विजयी आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडमध्ये भारताने पहिल्यांदाच सीरिज जिंकली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हॅमिल्टनमध्ये झालेल्या या टी-२० मॅचमध्ये न्यूझीलंडने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. यानंतर भारताने २० ओव्हरमध्ये १७९/५ एवढा स्कोअर केला. भारताने ठेवलेल्या १८० रनचा पाठलाग करताना न्यूझीलंडनेही १७९/६ एवढा स्कोअर केला, त्यामुळे मॅच सुपर ओव्हरमध्ये गेली.


भारताला एकहाती ही मॅच जिंकवल्याबद्दल रोहित शर्माला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. मॅचनंतर रोहित शर्माने सुपर ओव्हरबद्दलच्या रणनितीबद्दल खुलासा केला. 'मी याआधी कधीच सुपर ओव्हरमध्ये बॅटिंग केली नव्हती. पहिल्या बॉलपासून आक्रमक खेळ करायचा का थांबायचं, हे मला माहिती नव्हतं. मी आणि केएल राहुलने पहिल्या बॉलपासून बॅट फिरवण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगमध्ये मी चांगली कामगिरी केली, पण मी ज्या पद्धतीने आऊट झालो, त्यामुळे निराश आहे. पहिल्या २ मॅचमध्ये मी रन केले नव्हते, त्यामुळे या मॅचमध्ये मला चांगली कामगिरी करायची होती,' असं रोहितने सांगितलं.


पहिल्या २ टी-२० मध्ये अपयशी ठरल्यानंतर तिसऱ्या टी-२०मध्ये रोहितने ४० बॉलमध्ये ६५ रनची खेळी केली. रोहितने या इनिंगमध्ये ६ फोर आणि ३ सिक्सही मारले.


ओपनर म्हणून रोहितच्या १० हजार रन


रोहित शर्माने ओपनर म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार रनचा टप्पा ओलांडला. हा विक्रम करणारा रोहित हा चौथा भारतीय खेळाडू बनला आहे. रोहितने २१९ इनिंगमध्ये ५०.३३ च्या सरासरीने हे रन केले आहेत. ५० पेक्षा जास्त सरासरीने १० हजार रन करणारा रोहित हा एकमेव भारतीय ओपनर आहे. रोहितशिवाय सुनील गावसकर, वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर यांनी ओपनर म्हणून १० हजार रन केले आहेत.