फायनलचा विचार करत नाहीये...; वर्ल्डकपपूर्वीच Rohit Sharma चं धक्कादायक वक्तव्य
नुकतंच बीसीसीआयने रोहित शर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
मुंबई : T20 वर्ल्डकपला सुरुवात झालीये. या स्पर्धेत टीम इंडियाचा पहिला सामना पाकिस्तानशी होणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्माने स्पष्ट केलंय की, तो सध्या सेमीफायलन किंवा फायनल सामन्याचा विचार करत नाहीये. बीसीसीआयला दिलेल्या मुलाखतीत रोहितने याबाबत वक्तव्य केलं आहे. नुकतंच बीसीसीआयने रोहित शर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
वर्ल्डकप सुरु होण्यापूर्वी कपिल देव यांनी एक विधान केलं होतं. यावेळी ते म्हणाले होते, 'प्रश्न असा आहे की, टीम इंडिया टॉप 4 मध्ये स्थान मिळवू शकेल का? तो टॉप 4 मध्ये पोहोचू शकेल याची मला चिंता वाटतेय. माझ्यामते टीम इंडियाची उपांत्य फेरी गाठण्याची केवळ 30 टक्के शक्यता आहे.
दरम्यान बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये रोहित शर्माने केलेलं वक्तव्य हे कपिल देव यांना प्रत्युत्तर असल्याचं म्हटलं जातंय.
पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याविषयी बोलताना रोहित शर्मा म्हणाला, 'हा सामना भारतासाठी महत्त्वाचा आहे. टी-20 वर्ल्डकपमधील या सामन्याने आम्ही स्पर्धेची सुरुवात करणार आहोत. आम्ही कोणत्याही प्रकारचा ताण न घेण्याचा प्रयत्न करतोय. खेळाडू म्हणून आमचं लक्ष नेहमीच असतं.'
'टी-20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाचा कर्णधार होणं ही अभिमानाची बाब आहे. मी याबद्दल खूप उत्सुक आहे. मला काहीतरी खास करून दाखवण्याची संधी आहे. ही एक खूप मोठी स्पर्धा आहे, पण आम्ही त्याबद्दल जास्त बोललेलो नाही नाही. काही खेळाडू पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात खेळतायत. त्यांनाही परिस्थितीशी जुळवून घ्यावं लागतंय, असंही रोहित म्हणाला.
रोहित शर्माच्या म्हणण्यानुसार, 'आम्हाला पुन्हा एकदा वर्ल्डकप जिंकायचा होता. यासाठी आपल्याला अनेक गोष्टी बरोबर कराव्या लागतील. आम्ही सध्या उपांत्य फेरीचा किंवा अंतिम सामन्याचा विचार करत नाहीये. एका वेळी एक गोष्ट योग्य पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतोय. त्याचसोबत प्रत्येक सामना जिंकून पुढे जाण्याचा प्रयत्न सुरु आहे.'