रोहित शर्माने भर ट्राफिकमध्ये तरुणीसाठी गाडी थांबवली, पुढे काय केलं पाहा; कौतुक केल्याशिवाय राहवणार नाही
बांगलादेशविरोधातील कसोटी मालिका जिंकल्यानंतर रोहित शर्मा सध्या ब्रेकवर आहे.
भारतीय एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) सध्या विश्रांती घेतली आहे. बांगलादेशविरोधीत दोन सामन्यांची कसोटी मालिका जिंकल्यानंतर रोहित शर्माने ब्रेक घेतला आहे. भारतीय संघ सध्या बांगलादेशविरोधात टी-20 मालिका खेळत आहे. रोहित शर्माने टी-20 मधून विश्रांती घेतली असल्याने तो संघाचा भाग नाही. दरम्यान कसोटी मालिकेतील विजयामुळे भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी प्रबळ दावेदार ठरत आहे. भारतीय संघाकडे सध्या 74.24 टक्के गुण आहेत.
रोहित शर्मा सध्या ब्रेकवर असून यादरम्यानचा त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रोहित शर्मा मुंबईतील वर्दळीच्या रस्त्यावर आपली आलिशान लॅम्बोर्गिनी घेऊन बाहेर पडला आहे. यादरम्यान रोहित शर्माने मुंबईतील वर्दळीच्या ठिकाणी चाहतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कार थांबवली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
रोहित शर्माची गाडी जात असल्याने चाहत्यांनी त्याला पाहण्यासाठी तुफान गर्दी केली होती. यावेळी एकाने मुलीकडे हात दाखवत आज तिचा वाढदिवस असल्याचं सांगितलं. यानंतर रोहित शर्माने गाडी थांबवून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. व्हिडीओत दिसत आहे की, रोहित शर्मा गाडी थांबवून काच खाली घेतो आणि मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. रोहित तिच्यासह हस्तांदोन करतो. यावेळी मुलीचा आनंद गगनात मावेनासा झालेला असतो.
रोहित शर्माने टी-20 मधून निवृत्ती जाहीर केली असून आता सर्व लक्ष एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटकडे केंद्रीत केलं आहे. सध्या त्याने विश्रांती घेतली असून या काळात त्याला आगामी न्यूझीलंडविरोधातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी तयारी करण्याची संधी मिळत आहे. 16 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान ही कसोटी मालिका पार पडणार आहे. ही कसोटी मालिका जिंकत भारतीय संघाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनमधील स्थान पक्कं करण्याचा प्रयत्न असेल.
बांगलादेशचा पराभव केल्यानंतर भारताला लॉर्डमध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनला पात्र होण्यासाठी आणखी तीन सामने जिंकण्याची गरज आहे. मागील दोन प्रयत्नांमध्ये भारताच्या हाती यश आलं नव्हतं. भारतीय संघ आता सलग तिस-यांदा WTC फायनलमध्ये पोहोचण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यांना 2021 मध्ये न्यूझीलंड आणि 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाने इंग्लंडमध्ये पराभूत केलं होतं. 2022 च्या सुरुवातीला विराट कोहलीने कर्णधापदाचा राजीनामा दिल्यानंतर भारताच्या कसोटी कर्णधारपदाची जबाबदारी स्विकारलेल्या रोहितसाठी सातत्य महत्त्वाचं असेल.