मुंबई : कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रसारामुळे यंदाच्या वर्षीचं आयपीएल पुढे ढकलण्यात आलं आहे. त्यामुळे खेळाडूही घरात विश्रांती घेत आहेत. या फावल्या वेळेत क्रिकेटपटू त्यांच्या चाहत्यांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधत आहेत. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आणि फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह इन्स्टाग्रामवर लाईव्ह चॅट करत होते. या लाईव्ह चॅटदरम्यान रोहित शर्माने टीम इंडियाच्या खेळाडूवर निशाणा साधला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित आणि बुमराहच्या लाईव्ह चॅटदरम्यान विकेट कीपर ऋषभ पंतने कंमेट केली. या कमेंटमध्ये पंतने रोहितला सगळ्यात मोठ्या सिक्स मारण्याची स्पर्धा भरवण्याचं आव्हान केलं. बुमराहने पंतची ही कमेंट रोहितला दाखवली. 'पंतला तुझ्याबरोबर सगळ्यात मोठी सिक्स मारण्याची स्पर्धा करायची आहे,' असं बुमराहने रोहितला सांगितलं.



रोहित शर्मानेही बुमराहच्या या प्रश्नाला उत्तर दिलं. एक वर्ष झालं नाही त्याला क्रिकेट खेळून आणि सिक्सची स्पर्धा करायची आहे? असा टोला रोहितने पंतला लगावला. मुंबई इंडियन्सनेही रोहितचा हा व्हिडिओ ट्विटरवरून शेयर केला आहे. हिटमॅनसे पंगा पडेगा महंगा, असं ट्विट मुंबई इंडियन्सने केलं आहे.



रोहित शर्माला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १२ वर्ष पूर्ण झाली आहेत. वनडे क्रिकेटमध्ये रोहितने ८८.९२ चा स्ट्राईक रेट आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १३८.७८ च्या स्ट्राईक रेटने रन केले आहेत. वनडे क्रिकेटमध्ये ३ द्विशतकं करणारा रोहित जगातला एकमेव बॅट्समन आहे. वनडे क्रिकेटमधला सर्वाधिक २६४ रनचा स्कोअरही रोहितच्या नावावर आहे. 


आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्स मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित तिसऱ्या क्रमांकावर आहे. रोहितच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४२३ सिक्स आहेत. रोहितच्या पुढे क्रिस गेल आणि शाहिद आफ्रिदी आहेत.