ड्यूनेडिन : न्यूझीलंडचा बॅट्समन रॉस टेलर विक्रम करण्यापासून फक्त ५१ रन दूर आहे. या ५१ रन केल्यानंतर टेलर न्यूझीलंडचा वनडे क्रिकेटमधला सर्वाधिक रन करणारा खेळाडू ठरेल. सध्या हे रेकॉर्ड स्टिफन फ्लेमिंग याच्या नावावर आहे. फ्लेमिंगनं न्यूझीलंडसाठी २७९ वनडे मॅचमध्ये ८००७ रन केल्या होत्या. यामध्ये ८ शतकं आणि ४९ अर्धशतकांचा समावेश होता. रॉस टेलर हा या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. टेलरनं २१७ मॅचमध्ये ४८.२२ च्या सरासरीनं ७,९५७ रन केले आहेत. यामध्ये २० शतकं आणि ४६ अर्धशतकांचा समावेश आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२० फेब्रुवारीला न्यूझीलंड आणि बांग्लादेशमध्ये तिसरी वनडे होणार आहे. या मॅचमध्ये ३४ वर्षांच्या रॉस टेलरला न्यूझीलंडचा वनडेमध्ये सर्वाधिक रन करणारा खेळाडू व्हायची संधी मिळेल.


विक्रमाच्या उंबरठ्यावर असणाऱ्या रॉस टेलरला याबद्दल विचारण्यात आलं तेव्हा, 'तुम्ही एवढ्या मॅच खेळल्यावर, असे विक्रम होतच जातात. हा विक्रम मोडला तर मला आनंदच होईल, पण मी यापेक्षाही आणखी रन करीन, अशी अपेक्षा आहे. क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हा आणि न्यूझीलंडकडून खेळायला सुरुवात केली तेव्हादेखील फ्लेमिंग हा माझा आदर्श होता.'


रॉस टेलर हा न्यूझीलंडचा सर्वाधिक शतकं, अर्धशतकं आणि सर्वात जास्त सरासरी असणारा खेळाडू आहे. बांग्लादेशविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये टेलर आणखी एक विक्रम करण्यासाठी मैदानात उतरेल.