मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत सध्या नव्या अफवेचं पीक पसरलं आहे. भारताचा विकेट कीपर महेंद्रसिंग धोनीने भाजपा अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली असून तो भाजपाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, अशा चर्चांना उत आलाय. मात्र प्रत्यक्षात या दोघांच्या भेटीचं हे छायाचित्र मागील वर्षीचं असल्याचं आता समोर आलं आहे. 'संपर्क फॉर समर्थन' या मोहिमेच्या अंतर्गत भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी महेंद्रसिंग धोनीची मागील वर्षी भेट घेतली होती. तेव्हाचं हे छायाचित्र आता अमित शाह फॅन पेजवर कोणीतरी अपलोड केल्याने हा गैरसमज निर्माण झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. गौतम गंभीरने काही दिवसांपूर्वीच क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर लवकरच तो राजकारणात येईल अशी शक्यता वर्तवली जात होती. या शक्यतेवर शिक्कामोर्तब झालं आहे.


दुसरीकडे भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग याने वैयक्तिक कारण देऊन लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला होता. भाजपने सेहवागला हा प्रस्ताव दिला होता. पश्चिम दिल्ली मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी सेहवागचं नाव पुढे येत होतं. सध्या या जागेवर भाजपचे प्रवेश वर्मा खासदार आहेत. राजकारण किंवा निवडणूक लढवण्यात मला रस नाही, अशी प्रतिक्रिया सेहवागने दिली.


पश्चिम दिल्लीबरोबरच हरियाणाच्या रोहतकमधूनही सेहवागच्या नावाची चर्चा होत होती. पण सेहवागने या सगळ्या बातम्यांचा इन्कार केला. 'काही गोष्टी बदलत नाही, जशा अफवा. २०१४ सालीही असंच झालं होतं आणि आता २०१९ सालच्या अफवांमध्येही काही नवीन नाही. तेव्हाही रस नव्हता आणि आताही नाही,' असं ट्विट सेहवागने केलं होतं.